राज्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या युतीचा नेमका फायदा कुणाला होणार? आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या परिस्थितीत या युतीमुळे नेमका काय फरक पडणार आहे? याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. भाजपाकडून या युतीबाबत टीकेचा सूर लावला जात असून शिवसेनेला याचा फायदा होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. त्यासोबतच, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यासंदर्भात देखील देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

“आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे. मात्र, “उद्धव ठाकरेंसोबत आता कुणीही युती करायला तयार नाही, त्यांची अवस्था अशी झालीये की आता ते सैराट मित्रमंडळाशीही युती करतील”, अशा प्रकारची टीका भाजपाकडून केली जात आहे. यावरून राजकारण तापू लागलं असतानाच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

दरम्यान, नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. तसेच, यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिट्ठी या मुद्द्यांवरदेखील भाष्य केलं.

“उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झालीये की…”, निलेश राणेंचं खोचक ट्वीट; संभाजी ब्रिगेडशी युतीवरून टोला!

“काँग्रेसची अवस्था बुडत्या जहाजासारखी…”

“काँग्रेस एक बुडतं जहाज आहे. ज्यांना हे वाटतं की आता या जहाजाला वाचवता येणार नाही, असे लोक वेगळा निर्णय घेत आहेत. मला वाटतं गुलाम नबी आझाद यांनी काही वैध मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र, हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यावर मी काय बोलणार”, असं फडणवीस म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळणार?

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शिवाजी पार्कवर हा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात काय निर्णय घेतला जाईल, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. “राज्य सरकार नियमाबाहेरचं काहीही करणार नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय काय आहे हे मला माहिती नाही. ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो, जे नियमात असेल ते आम्ही करू”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.