Devendra Fadnavis : समाजात स्वत:च्या आधी इतरांचा विचार करणारे लोक वेळोवेळी पाहायला मिळतात. आपल्या आजूबाजूला देखील अशी अनेक मंडळी आहेत जी सामाजिक भान जपण्याची एकही संधी सोडत नाहीत. असाच एक मानवतेचे उदाहरण घालून देणारा प्रसंग नुकताच समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत यासंबंधी माहिती दिली आहे. नेरूळच्या आनंद वृद्धाश्रमात राहणारे ८२ वर्षीय सदानंद विष्णु करंदीकर यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तब्बल २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्र्‍यांनी देखील याचे वर्णन ‘दुःखातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण!’ अशा शब्दात केले आहे.

सदानंद करंदीकर हे सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांना अपत्य नसल्याने ते सध्या नेरुळ येथील आनंद वृद्धाश्रमात राहात आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या पत्नी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. या काळात त्यांनी कर्करोग झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची पैशांच्या कमतरतेमुळे होणारी धावपळ पाहीली आणि यानंतर त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी १० लाख म्हणजे एकूण २० लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या देणगीचा धनादेश सोपवतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“दु:खातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण! ८२ वर्षांचे सदानंद विष्णु करंदीकर आपल्या पत्नी सुमती करंदीकर यांच्यासह सेवा निवृत्त झाल्यानंतर अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात राहायला गेले. मात्र, मागील वर्षी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. यादरम्यान कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी होणारी धडपड करंदीकर यांनी जवळून पाहिली. त्यामुळे आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, अशा एकूण २० लाखांच्या देणगीचा धनादेश दिला. एकीकडे दु:खातून वेदना आणि नैराश्याची भावना निर्माण होणारी असंख्य उदाहरणे असताना दु:खातून करुणेच्या निर्मितीचे हे मूर्तीमंत उदाहरण… सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व असलेले सदानंद विष्णु करंदीकरजी यांचे हे मानवतेचा शिखरबिंदू ठरणारे कार्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी राहील!”