महाआरोग्य शिबिरासह अन्य कार्यक्रमासाठी शनिवारी जळगावमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा वेगळ्याच कारणांनी चर्चेत राहिला. महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमास भाजपचे अर्धा डझन मंत्रीही सहभागी झाले असले तरी महसूलमंत्री तथा जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे मात्र अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी आपल्या भाषणात खडसे यांचा नामोल्लेखही केला नाही.
तडीपारीची नोटीस मिळालेल्या मनसे नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या शिबिराच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील खडसे विरोधकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न महाजन यांनी केल्याचे अधोरेखीत झाले.
महाजन यांच्या पुढाकाराने खान्देश सेंट्रल मॉल येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि विदर्भ या दुष्काळी भागात महाआरोग्य शिबिरे आयोजित करून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे नमूद केले.
महाजन यांच्या रुपाने आम्हाला दुसरा आरोग्यमंत्री लाभला आहे. त्यांच्यामार्फत आरोग्य क्षेत्रात मोठे काम होत आहे. मंत्री नसल्यापासून आमदार निवासमधील २५ खोल्यांमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची निवास व भोजनाची व्यवस्था ते करत आहेत. काँग्रेस आघाडीचे मंत्री देखील रुग्णांची व्यवस्था करून घेण्याचे काम त्यांच्यामार्फत करून घ्यायचे, असे फडणवीस यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाजन यांनी जिल्ह्णाातील खडसे विरोधकांना एकत्र आणल्याचे दिसले.
खडसे यांच्यावर सातत्याने टीका करणारे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली. मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हेच्या तडीपारीसाठी पोलिसांनी अलीकडेच नोटीस बजावली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2016 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा वेगळ्याच कारणांनी चर्चेत
तडीपारीची नोटीस मिळालेल्या मनसे नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-01-2016 at 02:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis on jalgaon tour