माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी ( २४ एप्रिल ) जळगावातील पाचोऱ्यात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं. ‘तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील,’ असा अप्रत्यक्षपणे हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर केला होता. यावरून भाजपा आणि शिंदे गटातून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?
“हे लोक घराणेशाहीबद्दल बोलतात, पण घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं?,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होतं.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, “उद्धव ठाकरेंच्या भाषणात निराशा आणि तोच तो पणा होता. एकही नवीन मुद्दा उद्धव ठाकरे बोलले नाहीत. काही नेते फक्त शिवराळ भाषा वापरतात. राज्याच्या विकासावर एक शब्दही बोलत नाहीत.”
हेही वाचा : शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार? नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “शत्रुत्व असलं तरी…”
“शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल, रोजगार निर्मिती कशी होईल, यावर उद्धव ठाकरे बोलत नाहीत. त्यांच्या राजकीय जीवनात ते एक विकासाचा प्रकल्प करू शकले नाहीत. त्यांना पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसत आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची निराशा वाढत आहे. तीच निराशा उद्धव ठाकरेंच्या तोंडून बाहेर येत आहे,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.