Devendra Fadnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा मुंबईत पार पडला. आम्ही महापालिकेसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत. अनाजीपंतांनी आमच्यातला आंतरपाट दूर केला अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले तर उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘रुदाली’ असा केला.
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका काय?
“बऱ्याच दिवसांनी राज आणि माझी भेट अशी मंचावरती झाली आहे. आता पंचाईत अशी आहे की त्यांनी मला सन्मानीय उद्धव ठाकरे असं म्हटलं आहे. साहजिकच आहे त्याचं कर्तृत्व आपण सगळ्यांनी पाहिलं. माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्मानीय राज ठाकरे अशीच मी करेन. राजने इथल्या कार्यक्रमाची मांडणी राजने केली आहे. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला.” असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
जे बाळासाहेब ठाकरेंनाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवलं. त्यांनी आम्हाला दोघांना एकत्र आणलं असं राज ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते. या दोहोंबाबत प्रतिक्रिया विचारली असता, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख रुदाली असा केला आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“मी राज ठाकरेंचे आभार मानतो. कारण त्यांनी दोन बंधू एकत्र येण्याचं श्रेय त्यांनी मला दिलं. कुठेतरी श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. मला सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषणही झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या हा काही मराठीचा विजय नव्हता, ही रुदाली होतं. या रुदालीचं दर्शन त्या ठिकाणी आपण घेतलं आहे. मुळात त्यांना असूया आहे की २५ वर्षे महापालिका असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करु शकले नाहीत.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलला ते सगळ्यांनी पाहिलं. त्यांच्या काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळ, अभ्युदय नगर, पत्रा चाळ येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी घर दिलं याची असूया त्यांच्या मनात आहे. मुंबईतला मराठी माणूस असो की अमराठी सगळेच आमच्या बरोबर आहेत. आम्ही मराठी आहोत, मराठी असण्याचा अभिमान आहे. आम्ही हिंदुत्वववादी आहेत. हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान आहे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.