Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी रेडे कापून आणि मंत्र तंत्र करुन मला मुख्यमंत्री पदावरुन हटवलं, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिलं. तसंच उद्धव ठाकरे हे प्रचंड नैराश्यात गेले आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मंत्र-तंत्र करुन कुणाला खुर्चीवरुन हटवता येत असेल तर..
मंत्र-तंत्र कुणाला खुर्चीवरुन हटवता येत असेल तर तर मग निवडणुकीची गरजच काय? निवडणूक आयोगाच्या जागी तंत्र-मंत्र आयोग असता. जो सर्वाधिक रेड्यांचा बळी देईल तो मुख्यमंत्री झाला असता. या सगळ्या अफवा आहेत. त्या अफवांना काहीही अर्थ नाही. प्रार्थना करायचीच असेल तर मी ही प्रार्थना करतो की ज्यांच्या डोक्यात असले काही कुविचार येतात ते संपून जाओत. आसामला आमदार गेले होते, त्यावेळी सगळे आमदार कामाख्या मंदिरात गेले. तिथे कसले रेडे, कसले बळी दिले? काहीही घडलं नाही. कुणीही रक्ताचा टिळा लावला नाही. त्यांना पाहून काहीजण रक्ताचे अश्रू गाळत होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे प्रचंड नैराश्यात गेले आहेत..
उद्धव ठाकरे इतके नैराश्यात गेले आहेत की त्यांना रोज स्वप्न पडतं, त्यांना रोज नवीन विषय लागतो. उद्धव ठाकरे हे मान्यच करायला तयार नाहीत की त्यांच्या आमदारांसह त्यांचा संपर्क तुटला होता. उद्धव ठाकरेंकडे कमी खोके आहेत का? तसं काहीच नाही. उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी काय झालं माहीत आहे? एकनाथ शिंदे यांना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेंनी तोच दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं आणि कन्सल्टंट आतमधे मतदान कसं करायचं सांगत होता.
एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संपर्क केला तेव्हा मी त्यांना सांगितलं की…
एकनाथ शिंदेंनी जेव्हा महाराष्ट्राची सीमा ओलांडली तेव्हा माझ्याशी संपर्क केला. मला त्यांनी सांगितलं की मी निघालो आहे. त्यांना मी सांगितलं मी आहे काळजी करु नका. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. पुढे काय झालं ते सगळ्यांना माहीत आहेच. एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवून जो उठाव केला त्यानंतर पहिल्या दिवसापासून ठरलं होतं की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार. माझ्या किंवा इतर कुणाच्याही मनात बाकी कुठलीही गोष्ट आलीच नाही. मी सरकारच्या बाहेर राहणार होतो. पण माझ्या पक्षाने सांगितलं की तुला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. सरकारमध्ये मी होतो त्यामुळे आम्ही मजबुतीने ते सरकारही चाललं. इंडिया टीव्हीवरील आप की अदालत या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
एकनाथ शिंदे मुळीच नाराज नाहीत-फडणवीस
एकनाथ शिंदेंना राजकारण व्यवस्थित कळतं. आमच्या भाजपाच्या १३७ जागा निवडून आल्या. त्यांना हे माहीत होतं की इतक्या जागा आल्यानंतर जर मुख्यमंत्री भाजपाचा झाला नाही तर चुकीचा संदेश देईल. जेव्हा भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे जेव्हा पक्षाने सांगितलं तेव्हा तर एकनाथ शिंदेंनी एका मिनिटांत होकार दिला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे मुळीच नाराज नाहीत. शिवाय आमचं सरकार पाच वर्षे पूर्ण ताकदीने काम करणार आहे. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. विधान परिषदेत मी जे वक्तव्य केलं ती उद्धव ठाकरेंना काही ऑफर दिलेली नाही. मी गंमतीतच ते वक्तव्य केलं. खरं सांगायचं तर आमच्याकडे जागाच उरलेली नाही. २३२ जागा आमच्याकडे आहेत आता कुणाला आम्ही आमच्या बरोबर बसवणार. दुसऱ्या दिवशी आमची जी भेट झाली ती बंद दाराआड वगैरे झाली नाही. विरोधी पक्षनेता निवडलात तर बरं होईल हे मला त्यांनी सांगितलं. शिवाय मला तिसऱ्या भाषेबाबत त्यांनी एक पुस्तक भेट दिलं. इतकंच त्या वीस मिनिटांत घडलं असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मी कुणाला शत्रू मानत नाही-फडणवीस
महाराष्ट्राच्या राजकारणात मी कायमच हे मानत आलो आहे की वैचारिक मतभेद आहेत. मी राजकारणात कुणालाही शत्रू मानत नाहीत. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडतील की नाही माहीत नाही. ते काहीही करु शकतात. ते काय निर्णय घेतील हे कदाचित ते त्यांनाही सांगता येणार नाही. महाविकास आघाडी नाही तर इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे. त्यांच्या सांगण्यावरुन ही बैठक झाली. राजकीय भूकंप वगैरे काही होणार नाही, आम्हाला तरी दिसत नाही. मी विरोधी पक्षनेता झालो तेव्हा माझी खिल्ली उडवली गेली तेव्हा मी म्हटलं होतं मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बसा लेना, समंदर हूँ लौटकर वापस आऊंगा. ही आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.