Devendra Fadnavis on Local Body Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्ष अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे लढत आहेत. अनेक ठिकाणी भाजपाने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. तर, काही ठिकाणी वेगळी समीकरणं पाहायला मिळत आहेत. चाकणमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दोन्ही गट (उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंचे पक्ष) एकत्र आले आहेत. तर चिंचवडणध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट (शरद पवार व अजित पवारांचे) एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या युत्या किंवा आघाड्या होतात त्याला मोठ्या दृष्टीकोनातून किंवा मोठ्या चित्रात पाहणं अयोग्य आहे. कारण गावागावांमध्ये गटातटाचं राजकारण असतं. आमचं मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी एखाद्या गावात अशी स्थिती असते की दोन मित्रपक्षांचे नेते एकमेकांचे जानी दुश्मन (कट्टर शत्रू) असतात. मग अशा वेळी तिथे ते वेगवेगळे लढतात. असं चित्र सर्वच पक्षांमध्ये असतं.

गावागावांमधल्या युत्या-आघाड्यांकडे गांभीर्याने पाहू नका : फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले, “अनेक पक्ष व मित्रपक्षांचे नेते गावागावात वेगवेगळे लढतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं चित्र सर्रास पाहायला मिळतं. मात्र त्याकडे कोणीही फार गांभीर्याने पाहू नये. कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न असतो. गावात एखाद्याला वाटतं की अमुक व्यक्तीबरोबर जाऊन आपलं भलं होईल तेव्हा तिथे तशी वेगळी युती-आघाडी पाहायला मिळते.”

कोकणात शिवसेना (शिंदे) व भाजपा वेगवेगळे लढत आहेत. तर अशीच स्थिती नागपुरातही आहे. भंडारा-गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ‘एकला चरो रे’ची घोषणा केली आहे. असंच काहीसं चित्र पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातही आहे. तर, चाकणमध्ये वेगळं चित्र पाहायाल मिळत आहे. चाकणमध्ये वाद बाजूला सारून ठाकरे व शिंदेंचे आमदार चाकणमध्ये एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

चाकणमध्ये वेगळं समीकरण

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. चाकणमध्ये शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. मनिषा गोरे यांनी रविवारी (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे (उबाठा) स्थानिक आमदार बाबाजी काळे व शिवसेनेचे (शिंदे) आमदार शरद सोनावणे दोघेही उपस्थित होते. तसेच यावेळी दोन्ही शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.