Devendra Fadnavis on Nishikant Dubey & Raj Thackeray : भारतीय जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी समुदायाबाबत चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. तसेच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्तर प्रदेश, बिहारला या तिथे तुम्हाला आपटून-आपटून मारू (पटक पटक के मारेंगे) असं वक्तव्य केलं होतं. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुबे यांना म्हणाले, “तू मुंबईत ये, तुला समुद्रात बुडवून मारू (डुबा डुबा के मारेंगे)”. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दुबे नेमकं काय म्हणाले ते मी पाहिलं नाही. परंतु, ते जर असं काही म्हणाले असतील तर ते चुकीचं आहे. आपण सर्वजण कुठे चाललो आहोत हा मला प्रश्न पडला आहे. आपण इतके संकुचित कसे काय होत आहोत? मी माझ्या मराठी बांधवांबद्दल इथे बोलू इच्छितो, आमची संस्कृती काय आहे, आमचा इतिहास काय आहे, हे विसरून चालणार नाही.”

“मराठी माणूस इतका संकुचित असूच शकत नाही.”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठे हे केवळ मराठी भाषा किंवा महाराष्ट्रासाठी लढले नाहीत. देशात हिंदवी स्वराज्य आणण्यासाठी मराठे लढले. मराठे पानिपतला कशाला गेले? तिथे जाऊन का लढले? अहमदशाह अब्दाली तेव्हा मराठ्यांना म्हणाला होता, मला केवळ पंजाब आणि बलुचिस्तान द्या, उरलेला भारत तुम्हाला ठेवा, मी त्याला मान्यता देखील देईन. अब्दाली याचा हा प्रस्ताव स्वीकारून मराठे अब्दालीबरोबर तह करू शकले असते. परंतु, मराठ्यांनी तसं केलं नाही. ते अब्दालीला म्हणाले, आम्ही तुला एक इंच जमीन देखील देणार नाही. ही आमच्या देशाची भूमी आहे. त्यानंतर मराठे अब्दालीविरोधात लढले. पानिपतमध्ये लाखो मराठे मेले. परंतु, दहा वर्षात ते परत उत्तरेला गेले. त्यांनी दिल्लीवर आपला भगवा झेंडा फडकवला. हा मराठ्यांचा इतिहास आहे, तो विसरून चालणार नाही. त्यामुळे मराठी माणूस इतका संकुचित असूच शकत नाही.”

संविधानानुसार इथला कारभार चालेल : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री म्हणाले, “मराठी भाषेवरून आज जे काही चाललंय ते सगळं राजकारण आहे. सामान्य मराठी माणसाचं मराठी भाषेवर प्रेम आहे. तो मराठीसाठी अग्रही आहे. परंतु, हिंसा करणारा माणूस मराठी असू शकत नाही. निशिकांत दुबे म्हणतात, पटक पटक के मारेंगे, राज ठाकरे म्हणतात, डुबा डुबा के मारेंगे, या दोघांशीही आमचा काहीच संबंध नाही. जो महाराष्ट्रात येईल त्याचं आम्ही स्वागत करू. इथे कोणाशी दुर्व्यवहार होऊ देणार नाही. भारताचा कायदा जे काही सांगतो त्यानुसारच इथला कारभार चालेल.”