Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातला गाजलेला प्रयोग म्हणजे पहाटेचा शपथविधी. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याची आघाडी तयार होऊन महाविकास आघाडी सरकार राज्यात येईल अशी चर्चा सुरु असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत शपथ घेतली होती आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने राजकीय धक्का काय असतो ते पुन्हा एकदा अनेक वर्षांनी अनुभवलं होतं. याबाबत विचारलं असता या सगळ्या गोष्टी शरद पवारांची व्यवस्थित चर्चा करुन ठरल्या होत्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
८० तासांचं सरकार हे शरद पवारांना विचारुनच झालं होतं. उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला होता. त्यामुळे ते आमच्या बरोबर येणार नव्हते हे आम्हाला कळलं होतं. शरद पवारांनी आमच्याकडे त्यांचे दूत पाठवले होते. त्यामुळे आमची सगळी चर्चा शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शरद पवारांनी तो शब्द का फिरवला माहीत नाही. अजित पवारांनी शब्द फिरवला नाही त्यामुळे आम्ही पहाटेचा शपथविधी केला, मात्र ते सरकार ८० तासांत कोसळलं. शरद पवारांनी शब्द का फिरवला ते मला माहीत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती राजवट का लावण्यात आली?
राष्ट्रपती राजवट शरद पवारांच्या सांगण्यावरुनच लावण्यात आली होती. मला एकदम यू टर्न घेणं जमणार नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा. मी महाराष्ट्राचा दौरा करणार आणि त्यानंतर मी हे म्हणेन महाराष्ट्राला बळकट सरकार व्हावं ही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकार स्थापन करत आहेत. हे सगळं काही ठरलं होतं. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आप की अदालत या इंडिया टीव्हीवरील कार्यक्रमात सविस्तर मुलाखत दिली त्यावेळी पहाटेच्या शपथविधीबाबत हा खुलासा केला. राष्ट्रपती राजवट अशीच लागली नाही. शरद पवारांच्या पक्षाच्या राष्ट्रपती राजवटीच्या संमतीचं पत्र माझ्या संगणकावर टाइप झालं होतं. कारण आम्ही एकत्र सरकार स्थापन करणार होतो. राष्ट्रपती राजवट शरद पवारांच्या म्हणण्यानुसारच लावण्यात आली होती. शरद पवार यांनी शब्द का फिरवला हे अजूनही माहीत नाही. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
२०१९ मध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन लढलो होतो. शिवसेना आणि भाजपाची युती होती. आमचं सरकारही आलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे राष्ट्रवादीसह आम्ही जाणार नाही हे मी त्यावेळी अनेकदा बोललो होतो तरीही मी गेलो कारण राजकारण म्हणजे एक प्रकारचं युद्धच आहे. या युद्धात टिकून राहणं खूप आवश्यक असतं त्यामुळे आम्ही ती तडजोड केली होती असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.