पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय पातळीवरून विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या असून आगामी लोकसभा निवडणुकासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या या ऐक्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. आशिष देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
“देशात मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. ते पटण्याला रॅली करणार आहेत. फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही गेलात तर अशीच रॅली २०१९ मध्येही झाली होती. हातात हात घालून फोटो काढले होते. मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या निवडून आल्या नाहीत. मंचावर ५५ लोक होते आणि काँग्रेसच्या ४८ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे मी तर यांना आव्हान करतो, तुम्ही एकत्रित येत आहात, एकत्रित लढणार आहात. तुम्हाला मतदान देण्याआधी केवळ एवढंच सांगा की तुमचा एक नेता कोण आहे? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.
हेही वाचा >> “स्वतःच्या जातीचा…”, रक्तदान शिबिरात राज ठाकरेंकडून जातव्यवस्थेवर आसूड; म्हणाले…
“ममता बॅनर्जींनी सांगितलं, काँग्रेस कम्युनिस्टांसोबत चालली, आम्ही त्यांना मानत नाहीत. नितिश कुमारांनी एकाला काढून टाकलं. कोणी कोणाला नेता मानायला तयार नाही. त्यामुळे कितीही लोक एकत्र आले, जंगलातील किती जनावरे एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही. त्या वाघाप्रमाणे मोदी आहेत. कितीही एकत्रित आले तरीही मोदींसारख्या वाघाची शिकार करू शकणार नाहीत. राजा राजाच असतो. मागच्या लोकसभेत २०३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी जास्त जागा घेऊन मोदी निवडून येतील असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
दरम्यान, येथे वापरण्यात आलेल्या जनावरांचा उल्लेख शब्दशः न घेण्याचंही मिश्किल आवाहन देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं.
आशिष देशमुखांचं कौतुक
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळ फडणवीस म्हणाले की, “२०१९ मध्ये जो काही जिल्ह्यात अपघात झाला, त्या अपघातामुळे जिल्ह्यातील चार जागा आपण हारलो. शहरातील दोन जागा हरलो. जिल्हा परिषददेखील आपल्या हातून गेली. आता पुन्हा एकदा हा जिल्हा भाजपाचा जिल्हा आहे, हे दाखवून देण्याची संधी मिळतेय. बावनकुळेंच्या नेतृत्त्वात सर्व निवडणुकांमध्ये मला विश्वास आहे की भाजपा पूर्ण ताकदीने क्षमतेने मैदानात उतरेल आणि हा जिल्हा भाजपाचाच आहे हे दाखवून देईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला. एवढंच नव्हे अभूतपूर्व यश मिळालं. याचीच नांदी आहे की आपल्याला यशच प्राप्त करायचं आहे, म्हणून आशिष देशमुखांसारखे नेते आपल्याकडे येतात तेव्हा अधिक शक्ती आपल्याला मिळते.”