राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान, नाट्य रसिक मंच व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलैपासून सुरू झालेल्या श्रीसाईसच्चरित्र पारायण सोहळ्याची सांगता आज, शनिवारी वैभव प्रदीप ओक (डोंबिवली) यांच्या गोपाळकाला कीर्तनानंतर दहीहंडी फोडून झाली. या पारायण मिरवणूक सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी साई आरतीला उपस्थित राहून भक्तांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला.
काल, शुक्रवारपर्यंत चाललेल्या या पारायण सोहळ्यात शिर्डी व पंचक्रोशीतून सुमारे ७ हजार पारायणार्थींनी सहभाग नोंदवला. काल सकाळी अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) चे वाचन होऊन श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची समाप्ती झाली. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. पारायण समाप्तीनिमित्त शुक्रवारी दुपारी श्रीसाईसच्चरित्र ग्रंथाची पारायण मंडपापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक संबळ वाद्यांचे १० ते १२ पथके, श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ (कुडाळ) यांचे ३ धार्मिक देखावे असलेले चित्ररथ, तसेच रंजिनी आर्ट्स, मालाप्पुरा (केरळ) यांचे पारंपरिक वाद्य व दाक्षिणात्य नृत्यासह विविध सोंगे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.
या पारायण मिरवणूक सोहळ्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी साई आरतीला उपस्थित राहून भक्तांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला. शनिवारी वैभव प्रदीप ओक यांचे गोपाळकाला कीर्तन व दहीहंडी फोडून पारायण सोहळ्याची सांगता पार पडली. यावेळी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह श्री साईबाबा संस्थानचे अधिकारी, नाट्य रसिक मंचाचे पदाधिकारी, तसेच पारायणार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.