धाराशिव : राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव जिल्ह्यालाच कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सक मिळेना झाला आहे. मागील दहा महिन्यांपासून कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सकाविना आरोग्य यंत्रणेचा गाडा हाकला जात आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे राज्याच्या आरोग्याची धुरा असतानाही कायमस्वरुपी जिल्हा शल्यचिकित्सकाची नियुक्ती का केली जात नाही? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

कोरोनाच्या कालावधीत तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांच्यावर असमाधानकारक कामाचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आणि डॉ. धनंजय पाटील यांची जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा डॉ. गलांडे यांच्याकडे जिल्हा रुग्णालयाचा पदभार सोपविण्यात आला आणि सप्टेंबर २०२३ मध्ये डॉ. गलांडे यांची पदावनती करून त्यांना मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नेमण्यात आले. तेव्हापासून जिल्हा रुग्णालयाचा आणि एकूण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार प्रभावी सिव्हील सर्जनच्याच हाती आहे. मागील १० महिन्यांत चारवेळा जिल्हा शल्यचिकित्सकाचा पदभार इकडून तिकडे टोलविण्यात आला आहे. पूर्णवेळ सीएस असलेल्या गलांडे यांच्या पदावनतीनंतर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राहिलेल्या डॉ. इस्माईल मुल्ला यांच्या खांद्यावर सीएस पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. त्यानंतर केवळ १५ दिवसांसाठी डॉ. नागनाथ धर्माधिकारी प्रभारी सीएस म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. १५ दिवसांनंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये पुन्हा डॉ. इस्माईल मुल्ला यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. ३१ जुलै रोजी तडकाफडकी डॉ. मुल्ला यांनी सीएस पदाचा अतिरिक्त पदभार सोडून दिला. त्यामुळे कळंब येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांच्यावर आता सीएस पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला; ‘संभाजीराजे शाहू महाराजांचे वारसादर नाहीत’, या विधानानंतर समर्थकांचा हल्ला

हेही वाचा – Pooja Khedkar Hearing: पूजा खेडकर यांना मोठा धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला; अटक होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याच्या आरोग्य विभागाचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळत असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून सातत्याने केला जातो. पंढरपूरची आरोग्यवारी आणि तुळजापूर येथे नवरात्र काळात आयोजित केलेल्या आरोग्य मेळाव्याची मोठी चर्चा आहे. असे असतानाही आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी स्वतःच्या जिल्ह्याला पूर्णवेळ शल्यचिकित्सक का नेमला नाही? असा प्रश्न आता बिनदिक्कतपणे उपस्थित केला जात आहे.