धाराशिव : आपल्याच सहकारी असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिले काढण्यासाठी तसेच पगार, किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला गजाआड करण्यात आले आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे.

धाराशिव येथील लाचलुचपत विभागाला मिळालेल्या तक्रारीनुसार तीन हजाराची लाच घेताना बुधवारी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. डॉ नितीन कालिदास गुंड असे लाच घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. कंत्राटी पदावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि मसला खुर्द आणि सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरिक्त कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी त्याच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली. आरोपी डॉ. नितीन गुंड याने तक्रारदाराची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी व सदर रजेचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी सदरील लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्यही केली. पंचासमक्ष तीन हजार रुपये लाच स्वीकारताना डॉ. गुंड यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा – सातारा : महामार्ग सुसज्जीकरण कामावरील ठेकेदाराची क्रेन जाळण्याचा प्रयत्न, संतप्त कराडकरांचा पाणीप्रश्नी उद्रेक

हेही वाचा – Devendra Fadnavis : “अनिल देशमुखांच्या रेकॉर्डिंग माझ्या हाती, त्यांनी..”, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड, सापळा पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस अंमलदार इप्तेकार शेख, मधुकर जाधव, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.