विजय राऊत
मोखाडा तालुक्यातील पळसुंडा गावापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी ग्रामस्थांना नदी पार करावी लागत आहे. पावसात एखादी व्यक्ती दगावल्यास नदीच्या दोन्ही तीरांवर दोर बांधून पार्थिव अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे या नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हजार लोकसंख्येचे गाव असलेले पळसुंडा खोडाळा-मोखाडा रस्त्यानजीक आहे. या गावासाठी असलेली स्मशानभूमी दोन किमी अंतरावर आहे. नदीच्या पलीकडे स्मशानभूमी आहे. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदी ओलांडावी लागते. मात्र पावसाळ्यात नदीला पूर येतो. त्यामुळे ही स्थिती अधिकच बिकट होते.
स्मशानभूमीत सरणासाठी लाकडेही रांग लावून पोहोचवावी लागतात. गावातील एका महिलेच्या मृत्यूनंतर नदीपात्राच्या एका बाजूला ट्रॅक्टर आणि दुसऱ्या बाजूला झाडाला दोर बांधून पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आले.
नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय घेणार आहे. या ठिकाणी पूल व्हावा, अशी लेखी मागणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप गाटे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.