मनमाड : नांदगाव तालुक्यासह मनमाड शहरात करोना रुग्णसंख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असली तरी रुग्ण दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आणि मृत्यू नाही, ही जमेची बाब असली तरी रुग्णवाढ होऊ शकते. त्यामुळे दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. नांदगाव आणि मनमाड शहरामध्ये लसीकरणाबाबत निरुत्साह दिसून येत आहे. हे योग्य नसल्याचे नमूद करत मांढरे यांनी चिंता व्यक्त केली. 

नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्याचे प्रमाणही कमी आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत आवश्यक त्या सूचना प्रशासनास देण्यात आलेल्या आहेत. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी प्रतिबंधक सूचना आणि नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, लसीकरणाला जगभर मान्यता मिळाली आहे. लसीकरण ही सुरक्षित जीवनाची खात्री आहे. लसीकरण झाल्यानंतरही करोना झाल्यास तो चार-पाच दिवसांत पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे सुरक्षा कवच आहे, असे मांढरे यांनी सांगितले. नांदगाव येथील बैठक आटोपून जिल्हाधिकारी मांढरे हे मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात आले. तेथे त्यांनी येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, मनमाड  नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्याशी करोना परिस्थितीच्या संदर्भात आढावा घेऊन चर्चा केली.

प्राणवायूसाठा पुरेसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील अनुभव लक्षात घेऊन मनमाड आणि नांदगावला दोन प्राणवायू प्रकल्प सज्ज आहेत. या दोन्ही ठिकाणी प्राणवायूचा साठा आणि साठवणूक क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे प्राणवायुची कमतरता भासणार नाही. सध्या नांदगाव तालुक्यात करोनाबाधितांची संख्या २१७ आहे. ही चिंतेची बाब असली तरी कुणी रुग्णालयात नाही. मृत्यू नाही. तरीही आगामी काळात रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे दक्षता घ्यावी. तसेच लसीकरण वाढविण्यासंदर्भातही उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास करण्यात आल्या आहेत.