मनमाड : नांदगाव तालुक्यासह मनमाड शहरात करोना रुग्णसंख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब असली तरी रुग्ण दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आणि मृत्यू नाही, ही जमेची बाब असली तरी रुग्णवाढ होऊ शकते. त्यामुळे दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. नांदगाव आणि मनमाड शहरामध्ये लसीकरणाबाबत निरुत्साह दिसून येत आहे. हे योग्य नसल्याचे नमूद करत मांढरे यांनी चिंता व्यक्त केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्याचे प्रमाणही कमी आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. याबाबत आवश्यक त्या सूचना प्रशासनास देण्यात आलेल्या आहेत. करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी प्रतिबंधक सूचना आणि नियमांचे पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, लसीकरणाला जगभर मान्यता मिळाली आहे. लसीकरण ही सुरक्षित जीवनाची खात्री आहे. लसीकरण झाल्यानंतरही करोना झाल्यास तो चार-पाच दिवसांत पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे सुरक्षा कवच आहे, असे मांढरे यांनी सांगितले. नांदगाव येथील बैठक आटोपून जिल्हाधिकारी मांढरे हे मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात आले. तेथे त्यांनी येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, मनमाड  नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्याशी करोना परिस्थितीच्या संदर्भात आढावा घेऊन चर्चा केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discouragement in vaccination in manmad nandgaon zws
First published on: 19-01-2022 at 01:58 IST