महिला आरोग्य अधिकाऱ्याला रुग्णाची शिवीगाळ; पोलिसांकडून कारवाई नाही

उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाने शिवीगाळ  केल्याच्या निषधार्थ  पालघर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एका महिला आरोग्य अधिकाऱ्यावर शिवीगाळ करून अंगावर धावून गेल्याची घटना या रुग्णांकडून घडल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी रुग्णांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ३० ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. मात्र कारवाई होत नसल्याने पुन्हा गुरुवारी लेखी तक्रार देण्यात आली. याशिवाय पत्राद्वारे संपाचा इशारा देण्यात आला होता. तरीही कार्यवाही न झाल्याने ग्रामीण जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

दरम्यान निकडीच्या उपचारांसाठी सेवा देण्यात येणार असून आपत्कालीन कक्षात आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. २८ ऑगस्ट रोजी घटना घडूनही पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती रुणालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

बुधवार, २८ ऑगस्टच्या रात्री एक व्यक्ती त्याच्या काही साथीदारांसह पालघर ग्रामीण रुग्णालयात आला. त्याने डॉक्टरांकडे उच्च रक्तदाबाविषयी तक्रार केली आणि तातडीने तपासणीसाठी आला आग्रह धरला.

त्या वेळी प्रशिक्षणार्थी आरोग्य अधिकारी इतर रुग्णांना तपासत होत्या. ते पाहून व्यक्ती मोठय़ाने ओरडू लागली आणि अधिकाऱ्यावर शिवीगाळ करू लागली. त्याला थांबविण्यासाठी तेथील अधिपरिचारिका कक्षसेवक या पुढे आल्या, मात्र त्यांनाही शिवीगाळ करीत त्याने त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. यावर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने पोलीस अधीक्षक कार्यालयाला संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठीचे पत्र दिले.

मात्र आठ दिवस उलटूनही याबाबत कारवाई होत नसल्याचे लक्षात घेत रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले.

‘पोलीस गप्प का?

या घटनेनंतर अतिरिक्त जिल्हा शल्य यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पोलीस अक्षीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे सूचविले. तसे निर्देश त्यांनी पालघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. घटना घडून दहा दिवस उलटून गेले आहेत. तरीही पोलीस यावर काही करीत नाहीत. ही बाब योग्य नाही. पोलीस अशा प्रकरणात बघ्याची भूमिका कशी काय घेऊ शकतात, असा सवाल रुग्णालयातील  कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे ही अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे याविरोधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. -कांचन वानेरे,  जिल्हा शल्यचिकित्सक पालघर