श्रीगोंद्यातील भीमा नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा
जिल्हा पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्रीगोंद्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी, श्रीगोंद्यातील भीमा नदीपात्रातून वाळू तस्कारी करणाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज कारवाई करत, सुमारे ७० लाख रुपये किमतीच्या, वाळू उपसा करणाऱ्या १९ बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्या. काल, रविवारी ही कारवाई करण्यात आली. वाळूचा बेकायदा उपसा करणारे बहुसंख्यजण नदीपलिकडील शिरुरमधील (पुणे) आहेत, ते मात्र पसार झाले.
शिरुर व श्रीगोंद्याच्या हद्दीवरून भीमा नदी वाहते. शिरुरच्या हद्दीतील बहुतांशी वाळू तस्करांकडून उपसली गेली आहे, त्यामुळे त्यांचा मोर्चा आता श्रीगोंद्याकडे वळलेला आहे. महसूल व पोलिसांच्या पथकावर नजर ठेवण्यासाठी या वाळू तस्करांनी टेहाळणी करणारे नियुक्त केले आहेत. पथक कारवाईसाठी आले की ते उपसा करणाऱ्या बोटींना इशारे देतात.
श्रीगोंदा तालुक्यातील गार, राजापूर व माठ या गावांच्या शिवारातील भीमा नदीपात्रातील पाण्यातून व घोड धरणाचे पाण्यातून यांत्रिक बोटीच्या मदतीने चोरून वाळू उपसा करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छाप्याची तयारी केली. या कारवाईत हवालदार विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ, विशाल दळवी, रणजित जाधव, बाळू पालवे, शिवाजी ढाकणे, विश्वास बेरड, मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने, संदीप चव्हाण, मयूर गायकवाड, संभाजी कोतकर तसेच श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मात्र बेकायदा वाळू उपसा करणारे बोटी सोडून पसार झाले.
पोलीस व महसूल पथकाने ९ लोखंडी, ७ फायबरच्या व तीन हायड्रालिक लोखंडी अशा एकूण १९ बोटी जिलेटिनच्या सहायाने उद्ध्वस्त केल्या. या बोटींची किंमत सुमारे ७० लाख रु पये आहे. जिल्हा प्रशासनाची ही आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. पोलीस व महसूल पथकाने यापूर्वी श्रीगोंद्यातील माठ, गार, राजापूर परिसरातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात बेकायदा उपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनच्या मदतीने उद्ध्वस्त केल्या आहेत. बोटी महसूल पथकाने जिलेटिन मदतीने स्फोट करून नष्ट केल्या.