सांगली, कोल्हापूरच्या महापुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली. आता पूर ओसरला असला तरीही ही दोन्ही शहरं आणि या शहरांलगत असलेली गावं हळूहळू सावरत आहेत. पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. अनेकांची घरं कोसळली, वाहून गेली. आता या सगळ्या पूरग्रस्तांना आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने पाच लाखांची मदत केली आहे.  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण दहा लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे देण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील हे उपस्थित होते.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली  यांना महापुराने गाठलं. या महापुराला अनेकांनी तोंड दिलं. अनेकांना आहे त्या अवस्थेत घर सोडून निघावं लागलं. पूर ओसरल्यावरही अनेकांची घरं उद्धवस्त झाली, त्यांच्या घरातले सामान वाहून गेले. यामुळे महाराष्ट्रातील सर्व स्तरातून मदत केली गेली, अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना पुन्हा उभारी मिळण्यासाठी मदत अत्यंत गरजेची होती. त्यामुळेच अनेक संस्था, नागरिकांनी पुढे येऊन सढळ हातांनी मदत केली. आता नागरिक हळूहळू सावरत आहेत. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मदतीचे आवाहन केले होते. मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी रक्कम रुपये ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण १० लाख रूपयांचा धनादेश देण्ययात आला.

सामाजिक बांधिलकीचे जाणिवेतून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून आवश्यक तिथे संसार उपयोगी भांडी, धान्य, किराणा, शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी सांगितले.