महाविकास आघाडी सरकार असताना मी सगळ्याच मंत्र्यांना सहकारी म्हणायचो. आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीत अजित पवार, जयंत पाटील आणि माझ्यासोबत मला साथ देणारे सगळेच माझे लढवय्ये सहकारी आहेत असं मी आता म्हणेन असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला वाटलं नव्हतं की पोटनिवडणूक अशा पद्धतीने लढवावी लागेल. निवडणूक जिंकणं ही इच्छा काही नवी नाही. आपला विरोधक आपल्यातून गेला आहे आणि त्यामुळे आपल्याला निवडणूक घ्यावी लागावी हे दुर्दैवी होते. लक्ष्मणराव जगताप आणि मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. भाजपाची राजकारणावरची पाशवी पकड ढिली करायची असेल तर कसबा पोटनिवडणूक जिंकावीच लागेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काही जण म्हणतात की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. ही मागणी रास्त आहे कारण दोन्ही उमेदवारांचं आजारपणाने निधन झालं आहे. मात्र निवडणूक बिनविरोध घेण्यासाठी जो मोकळेपणा होता लोकशाहीत तो आता उरला आहे का? दुर्दैवाने या दोन निवडणुका आल्या आहेत. ज्यांना वाटतं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटत असेल तर मग कसब्यात लोकमान्य टिळकांचं घराणं वगळून उमेदवारी दिली गेली ती का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उमेदवारी बदलल्यानंतर मला खरंच वाईट वाटलं. गिरीश बापट यांची अवस्था पाहून मला वाईट वाटलं. गिरीश बापट यांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. सर्वात क्रौर्याचा कळस म्हणजे गिरीश बापट गंभीर आजारी असताना प्रचाराला उतरवता हा कुठला अमानुषपणा आहे? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत एक अपप्रचार केला गेला होता की शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? शिवसैनिक राष्ट्रवादीला मतदान करणार का? हो करणार कारण २५-३० वर्षे भाजपलाही मतदान केलंच होतं. जर काँग्रेस राष्ट्रवादी २५ ते ३० वर्षे जे वागलं हे आता भाजपा वागत असेल तर मग तमाम शिवसैनिक हे काँग्रेस, राष्ट्रवादीलाच मतदान करणार. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जे शिवसेनेला मुळापासून उखडायला निघाले आहेत त्या भाजपाला मदत होईल असं वागायचं नाही. नाहीतर मग आपण शिवसेना हे नाव लावायचं नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्यामध्ये भाजपाने फूट पाडली, शिवसेना संपवायला निघाले. हे राजकारण मी कधीही मानणार नाही. भाजपाला सहानुभूती दाखवण्याची परिस्थिती आता नाही. लोकांचा वापर करून भाजपा जर आपली पाशवी पकड जर घट्ट करू पाहात असेल तर ती ढिली करावीच लागेल आणि नाईलाज म्हणून ही निवडणूक जिंकावीच लागेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.