२००५ च्या पुराच्या वेळी जी पाणी पातळी होती ती पाणी पातळी आता ग्राह्य धरणं चुकीचंच आहे असं परखड मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी दौरा करुन त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांचं मत व्यक्त केलं. तसंच पूर समस्येवर आता कायमचा उपाय योजण्याची गरज आहे असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. पूरग्रस्तांना सरकारने नवीन घरं बांधून दिली पाहिजेत. या घरांच्या बांधकामाचा दर्जाही चांगला असला पाहिजे असंही शरद पवारांनी सुचवलं आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधलं. पुरात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे. उस उत्पादक शेतकऱ्यांनी नवे बेणे घेऊन उसाची लागवड केली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांना नवे बेणे द्यायची व्यवस्थाही करायला हवी असेही पवार यांनी म्हटलं आहे.
सांगली आणि कोल्हापुरात आठ दिवस पुराचं थैमान होतं. या सगळ्या परिस्थितीत लाखो लोकांचं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार मोडले. अनेक लोक बेघर झाले आहेत. सरकारही त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतं आहे. तसेच अनेक सेवाभावी संस्थांनीही ही दोन शहरं पुन्हा वसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.