अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालो आहोत असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे. तसंच त्यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपाचा हा तिसरा अंक ठरला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात हे सगळे गेले आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसंच घर फुटलं असं वाटतं का? या प्रश्नावरही उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
जे काही घडलं आहे ते मला नवं काहीही नाही. याआधीही अशा गोष्टी घडल्या आहेत. पक्ष फुटला आहे आणि घर फुटलं आहे असं मला मुळीच वाटत नाही. घर फुटलं आहे असं मी कधी म्हटलं नाही, म्हणणार नाही. हा विषय जनतेशी संबंधित असतील. काही अडचणी आणि कमतरता असतील तर चर्चा होते. पक्ष आम्ही वाढवणार आहे. अनेक लोक संपर्क साधतात पण प्रत्यक्ष किती लोक माझ्यासह आहेत आत्ता माहित नाही. काही सहकाऱ्यांनी एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हीच पक्ष आहोत असं त्यांनी आता म्हटलं आहे. मात्र यामुळे पक्ष फुटलाय, घर फुटलंय मला वाटत नाही. दोन-तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल. काही बंडखोर आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही माझं आणि अजित पवारांचं काहीही बोलणं झालेलं नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास
माझा महाराष्ट्रातल्या जनतेवर आणि तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. मला जाता येईल तिथे मी आधीच्या निवडणुकीत गेलो होतो. आता उद्यापासूनही मी विविध ठिकाणी जाणार आहे. आज पुन्हा एक स्थिती आली आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून अनेकांनी मला फोन करुन सांगितलं आणि आपण सगळे एक आहोत असं अनेकांनी सांगितलं. इथे यायच्या आधी ममता बॅनर्जींचा फोन आला होता असंही शरद पवारांनी सांगितलं. एक पर्यायी शक्ती उभी करावी याची आवश्यकता आहे असं म्हणणारे लोक आहेत. अखेर जो काही प्रकार घडला त्याची मला चिंता नाही. माझा प्रयत्न राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल आणि जनसंपर्क वाढवता येईल ही माझी उद्याची नीती आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
आम्ही लोकांमध्ये जाणार, लोकच पुढचा निर्णय घेतील
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगू दे किंवा काहीही करु दे माझा लोकांवर विश्वास आहे. हा निर्णय लोक घेतील असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला ही बाब मला माध्यमांकडून कळली आहे. त्यांनी राजीनामा दिला असेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे दिला असेल आम्हाला त्याची कल्पना नाही. पक्षाचं नाव घेऊन कुणी काहीही भूमिका घेतली तरी आम्ही भांडण करणार नाही. आम्ही लोकांसह जाणार आहोत आणि लोक पुढचा निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसची जी नीती आहे त्यात ही गोष्ट बसणारी नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.