आपसात दगाफटका चालणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना सज्जड इशारा तर पक्षाचे उमेदवार राजीव राजळे यांना समज देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारीवरून निर्माण झालेली धुसफूस शांत करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसमध्ये एकजूट राहिली तरच आपण जिंकतो, दगाफटका झाला तर विरोधी पक्ष जिंकतात. जिल्ह्य़ात स्वत:च्या पक्षाचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीवालेच करू शकतात या शब्दांत पवार यांनी जिल्ह्य़ातील राजकीय वास्तवाकडे लक्ष वेधले. याला निमित्त ठरला काँग्रेसचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केलेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील परस्पर अविश्वासाचा विषय!
लोकसभा निवडणुकीतील राज्यातील काँग्रेस आघाडीचा पहिलाच प्रचाराचा नारळ फुटला तो नगर दक्षिणमधील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा. त्यासाठी शहरातील हुंडेकरी लॉन्समध्ये पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा रविवारी दुपारी आयोजित करण्यात आला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या टीकाटिप्पणीने उपस्थितांना अंतर्गत मतभेदांचे दर्शन घडले. मेळाव्यासाठी उमेदवार राजळे यांनी भाषण लिहून आणले होते, ते भावनाविवशपणे वाचत राजळे यांनी आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते भाऊ, मुलगा समजून माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपणही यापुढे कधी दुजाभाव करणार नाही. सर्व ज्येष्ठांचा सन्मान करू, अशी ग्वाही दिली.
पक्षाचे नेते शरद पवार यांनीच राजळे यांची उमेदवारी निवडल्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्य़ातील नेत्यांना निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ करू नका, हलक्या कानांचे राहू नका, असा इशारा दिला. अंतर्गत धुसफूस शांत करण्यासाठी पवार बैठक घेणार असल्याची चर्चा रंगली होती, परंतु पवार यांनी जाहीर भाषणातूनच या विषयाला हात घातला. राजळे यांनी केवळ लोकसभा, दिल्लीतील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला देतानाच पवार यांनी तालुक्यातील दैनंदिन कामात ते लुडबूड करणार नाहीत, अशी ग्वाहीही पवार यांनीच दिली. मात्र नेत्यांच्या तालुक्यातून राजळे यांना मताधिक्य मिळालेच पाहिजे असा आग्रहही त्यांनी धरला.
किरकोळ कारणावरून आपल्यात अंतर पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील, एसएमएस पाठवतील. सोशल मीडिया, ट्विटर, इंटरनेट, फेसबुकमधून काहीही घडू शकते, त्यावर विश्वास ठेवू नका. राजळे यांचे मामा काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजळे यांचा स्वभाव तापट असल्याचा उल्लेख केला होता. पवार यांनी तो संदर्भ देत, राजळेंपेक्षा मी खूप तापट आहे, परंतु तरीही निवडून येतो, कारण मी लोकांची कामे करतो, राजळे यांनी हे लक्षात घ्यावे, असा सल्लाही दिला. राजळे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या वेळी पालकमंत्री मधुकर पिचड यांनी, मीच तुझा मामा अशा शब्दांत राजळे यांना दिलासा दिला होता, ते लक्षात ठेवून थोरात यांनी आता मामा खूप झाल्याने राजळे यांचा विजय निश्चित असल्याची टिप्पणी केली.
काँग्रेसमधील परंपरागत विरोधक असलेले विखे व थोरात यांनी वेगवेगळ्या वेळी मेळाव्यास हजेरी लावली. दोघेही आपापले भाषण आटोपून निघून गेले. विखे यांनी जिल्ह्य़ातील दोन्ही पक्षांमधील नेते, कार्यकर्त्यांत परस्परांबद्दल अविश्वास ठेवून निवडणुकांना एकत्रित सामोरे कसे जाणार असा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येकाच्या मनातील किंतु-परंतु, समज-गैरसमज दूर होऊन निवडणुकीसाठी सामंजस्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 
जि. प.त दुरुस्तीची तयारी
जिल्हा परिषदेत भाजप-सेनेला बरोबर घेतल्याची चूक दुरुस्त करण्याची आपली तयारी आहे, त्याबाबत मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. एका झटक्यात करायचे झाले तरी, मी ही दुरुस्ती उद्याच करू शकतो. परंतु नगरसह उस्मानाबादचीही चूक काँग्रेसने दुरुस्त केली पाहिजे. दोन्ही दुरुस्त्या एकाच दिवशी झाल्या पाहिजेत, आम्ही केव्हाही तयार आहोत असे ते म्हणाले.