छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा (जून प्रारुप- २०१३) बुधवारपासून (दि.१२) सुरु होणार आहेत. चार जिल्ह्यात मिळून ३३ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाची ऑक्टोबरमध्ये कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यानूसार ‘जून पॅटर्न २०१३’ या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १२ नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम सह एकूण ३२ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर नवीन शैक्षणिक प्रारुप (एनईपी) प्रमाणे बीए, बी.कॉम व बी.एस्सी या अभ्यासक्रमांची परीक्षा १८ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. तर एम.ए, एम.एस्सी, एम.कॉमसह परंपरागत पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या जानेवारी २०२६ मध्ये होणार आहेत.

पर्यावरणशास्त्र ईव्हीएस व भारतीय संविधान हा पेपर २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सर्व केंद्रावर परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच समन्वयक विभागातील सहायक कुलसचिव भगवान फड, राजेंद्र गांगुर्डे, महेंद्र पैठणे हे प्रयत्नशील आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

२३३ परीक्षा केंद्र, ३२ भरारी पथक

या सर्व परीक्षांना मिळून सुमारे तीन लाख ६० हजार विद्यार्थी बसले आहेत. तर २३३ परीक्षा केंद्र आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर – ९०, जालना – ५२, बीड- ६५, तर धाराशिव जिल्हयात २४ केंद्र आहेत. या केंद्रासाठी ३२ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १ ते २ डिसेंबर रोजी परीक्षेला सुट्टी देण्यात आली आहे. – डाॅ. बी. एन. डोळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग.