देशातील वातावरण एकीकचे असहिष्णू होत असल्याच्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर दुसरीकडे आपल्या सामाजिक आणि मानवतावादी कृतीतून अशा वादविवादांना चोख प्रत्युत्तर देणारेही आहेत. धुळ्यातील डॉ. मुकर्रम खान हे त्यापैकीच एक. केवळ मानवी कल्याणासाठी वैद्यकीय पेशा स्वीकारणाऱ्या खान यांच्यामुळे एका गरीब शेतमजुराच्या अंधकारमय आयुष्यात पुन्हा प्रकाश आला आहे.
साक्री तालुक्यातील अक्कलपाडा येथील शिवाजी सुकदेव कर्वे (४५) यांना दहा वर्षांपूर्वी दोन्ही डोळयांचे अंधत्व आले होते. शेतीकाम करताना रासायनिक खताचे कण डोळ्यात गेल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली होती. वयाची ऐंशी गाठलेल्या आई ठगूबाई यांच्यावर शिवाजी यांची संपूर्ण जबाबदारी आली होती. ठगूबाई मोलमजुरी करून स्वत:सह शिवाजी यांचा सांभाळ करत होत्या. ज्या वयात मुलाने आईची सेवा करायची त्या वयात आईकडूनच आपली सेवा होत असल्याने शिवाजी हे मनोमन आपल्या भाग्यास दोष देत. एकदा दोघे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले. कर्वे यांची कौटुंबिक स्थिती आणि त्यामुळे ठगूबाई यांचे होणारे हाल रुग्णालयातील डॉक्टरांना पाहवले नाहीत. तपासणीनंतर शिवाजीवर उपचार करण्यास अनेक डॉक्टरांनी नकार दिला. अशा स्थितीत अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय रुग्णालयाचे उपअधीक्षक तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकर्रम खान यांनी घेतला. शिवाजीला मधुमेह असल्याने शस्त्रक्रियेसाठी तो एक अडथळा ठरत होता. त्यावर यशस्वीपणे मार्ग काढण्यात आला. शिवाजी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन्ही डोळ्यांमध्ये लेन्स टाकण्यासाठी येणारा सुमारे १६ हजार रूपयांचा खर्च आणि औषधोपचाराची जबाबदारी डॉ. खान यांनी स्वत: पेलली.
तीन एप्रिल रोजी शिवाजी यांच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्याचे ठरले. या वेळी शिवाजी यांनी अंधत्वात आपली सेवा करणाऱ्या आईला सर्वप्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली. न्या. आर. आर. कदम यांच्या हस्ते शिवाजी यांच्या डोळ्यांवरील पट्टी दूर करण्यात आली. पट्टी काढल्यावर शिवाजी यांनी तब्बल दहा वर्षांनंतर जर्जर झालेल्या आई ठगूबाई यांना डोळे भरून बघितले. या क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्वच उपस्थितांचेही डोळे यावेळी भरून आले. डॉ. खान यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच हे सर्वकाही घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. इतर डॉक्टरांनीही ठगूबाई यांच्या अस्थिरोगावर उपचार केले. रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. एस. गुप्ता, शंभू घोणशीकर, प्रशांत अग्रवाल, मीनाक्षी नारखेडे, सयाजी भामरे या डॉक्टरांचा त्यात समावेश आहे.