सांगली: जात, भाषा आणि धर्म यामध्ये देश दुभंगत चालला असून चुकीच्या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सर्वांना एकत्र घेउन वाटचाल करणार्या नेतृत्वाची आज गरज आहे असे प्रतिपादन पद्यभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
सांगलीतील कर्मवीर नागरी पतसंस्था व विश्वस्त संस्थेच्यावतीने देण्यात येणार्या कर्मवीर भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम डिग्रज येथील डॉ. शिवाजीराव कदम फार्मसी कॉलेज येथे शनिवारी सायंकाळी झाला. त्यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते. यावेळी आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आयसीटी मुंबईचे कुलगुरू डॉ. अनिरूध्द पंडित, डॉ. प्रकाश कोंडेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शिवाजीराव कदम यांना कर्मवीर विद्याभूषण, मनोहरलाल सारडा यांना उद्योगभूषण व डॉ. संजीव माने यांना कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आणखी वाचा- वाळव्यात श्रेयवादावरुन तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात
यावेळी आपल्या प्रमुख भाषणामध्ये डॉ. माशेलकर म्हणाले, भारताला महासत्ता बनविण्यासाठी सर्व शक्ती केंद्रित करण्याची गरज आहे. यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. देशातील ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात, तर १४ टक्के लोक झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात बरीच प्रगती करता आली असली तरी महासत्ता बनण्यासाठी बराच मोठा पा गाठायला हवा. गेल्याकाही वर्षापासून जात, भाषा व धर्म यामुळे दुफळी निर्माण होत आहे. प्रगतीसाठी या गोष्टींचा नेतृत्वाने विचार करायला हवा. देशप्रेम, धैर्य आणि आत्मविश्वास या बाबी आजच्या युवा पिढीपुढे आहेत. नवी पिढी चांगले बदल घडवत असली तरी त्याला सकारात्मक दिशा देण्याची गरज आहे.