संदीप आचार्य

‘त्या’ कारच्या अपघातातील जखमी विव्हळत होते. आजुबाजूचे बघे त्याचे मोबाइलवर व्हिडिओशुटींग करीत होते. बहुदा त्यांना ती घटना फेसबुकवर टाकून जास्तीत जास्त लाईक मिळवायचे असतील… अचानक दोन रिक्षा अपघातस्थळी दाखल झाल्या. काहीही न बोलता रिक्षाचालक त्या कारमधील जखमींना बाहेर काढू लागला त्यांच्या जखमांचा अंदाज घेऊन योग्य प्रकारे उचलून रिक्षात घालून त्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या जखमींचा जीव वाचला… दुसऱ्या एका घटनेत रस्त्यावरून चालणारी एक व्यक्ती अचानक कोसळली… ती व्यक्ती हाताने छाती अवळत होती. शेजारच्या चहाच्या टपरीवर घोटभर चहा घेण्यासाठी थांबलेल्या रिक्षाचालकाने हा प्रकरा पाहिला आणि त्याने धावत जाऊन त्या व्यक्तीला (सीपीआर) कृत्रिम श्वाशोच्छवास देतो आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करून जीव वाचवतो… येत्या काही दिवसात मुंबईपासून जवळ असलेल्या डहाणूमध्ये प्रथमोपचारासज्ज जीवरक्षक रिक्षाचालकांच्या माध्यमातून अशा अनेक जीवनदायी घटना पाहायला मिळतील.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

विख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा डहाणुनजिक चारोटी येथे कार अपघातात झालेला मृत्यू, तसेच आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू सर्वांनाच हळहळ वाटणारा होता. क्रिकेटपटू ऋषभ पंत यांचाही कार अपघात झाला. असे अनेक रस्ते अपघात जागोजागी होत असतात. अशा अपघातांतील जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळू शकली व जागीच काही प्रथमोपचार होऊ शकले तर यातील अनेकांचे जीव वाचू शकतात. नेमकी हीच गोष्ट ओळखून डहाणू येथील विख्यात अस्थिशल्यविशारद व ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ डहाणूचे अध्यक्ष डॉ. संजय सोहोनी यांनी रस्ते अपघातातील जखमींच्या मदतीसाठी रिक्षाचालकांच्या मदतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

डहाणू असो की अन्य कोणते शहर, अपघातातील जखमींच्या मदतीसाठी तात्काळ जर कोणी धावू शकणार असेल तर तो म्हणजे रिक्षाचालक. या रिक्षाचालकांना अपघातामधील जखमींना तात्काळ कशा प्रकारे मदत करायची, कोणते प्रथमोपचार करायचे, तसेच हाड मोडलेल्या रुग्णांना कशाप्रकारे उचलायचे आदी प्रशिक्षण दिल्यास मोठ्या प्रमाणात अशा अपघातातील लोकांचे जीव वाचू शकतील हे लक्षात घेऊन डॉ. सोहोनी यांनी डहाणुमधील रिक्षाचालकांशी तसेच त्यांच्या सघटनांशी संवाद साधून जीवरक्षक बनण्यासाठी साद घातली. या हाकेला रिक्षाचालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून १०० रिक्षाचालकांची जीवरक्षक तुकडी येत्या काही दिवसात विशेष प्रशिक्षित केली जाणार आहे.

डॉ संजय सोहोनी यांनी १९९१ ते १९९५ दादर आणि विलेपार्ले भागात व्यवसाय केला. त्यानंतर एक वर्ष अमेरिकेत होतो. परत आल्यानंतर मुंबईत व्यवसाय न करता ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्याच्या दृष्टीकोन घेऊन गुजरातला लागून असलेल्या डहाणु तालुक्यात अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून १९९६ मध्ये व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला इथे चांगली रुग्णालये नव्हती, रक्तपेढी नव्हती, सीटीस्कॅन व एमआरआय तर सोडा, पण अनेक रुग्णालयात एक्सरे मशीनही नव्हती. त्याही परिस्थित अनेक कठीण आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. आता परिस्थिती बदलली असली तरी एक गोष्ट अजूनही बदललेली नाही. आपत्कालीन रुग्णाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत कोणतेही प्रथमोपचार मिळत नाहीत. त्यातच रुग्णालये कमी असल्यामुळे अपघातातील रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार न मिळाल्यामुळे दगावण्याचे प्रमाण अधिक आहे.

रस्त्यावरील अपघाताव्यतिरिक्त इथे समुद्रकिनारा जवळ असल्याने बुडण्याच्या घटना घडतात, रेल्वे अपघात होतात. कोरोनानंतर हृदयविकार एवढे वाढले आहेत की हल्ली अनेक व्यक्ती रस्त्यावर चालता चालता कोसळतात. अशांना ताबडतोब सीपीआर देण्याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे प्रस्तावित बुलेट ट्रेन, मुंबई-दिल्ली महामार्ग, वाढवण बंदर असे मोठमोठे प्रकल्प डहाणूच्या आजूबाजूला चालू आहेत. भविष्यात रहदारी अजून वाढणार आणि अपघातांची संख्याही वाढणार. अशावेळी जास्तीत जास्त लोकांना प्रथमोपचाराचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. सोहोनी यांनी सांगितले.

मध्यंतरी सायरस मिस्त्री यांचे चारोटीला अपघाती निधन झाल्यानंतर ही गोष्ट मला अधिक प्रकर्षाने जाणवू लागली. आयएमए डहाणूचा अध्यक्ष या नात्याने डहाणू पट्ट्यात अनेक आरोग्यविषयक उपक्रम आम्ही राबवत असतो. यात कर्करोग शिबिरांपासून रक्तदान तसेच आरोग्यविषयक अन्य उपक्रमांचा समावेश आहे. तथापि रस्ते अपघातातील जखमींना गोल्डर अवरमध्ये मदत मिळण्यासाठी ठोस काही तरी करावे ही संकल्पना घेऊन काम करू लागलो. यात अशा अपघाताच्या ठिकाणी हमखास उपस्थित असणारी व्यक्ती म्हणजे रिक्षाचालक असते. त्यांना जवळपासची रुग्णालये, डॉक्टर्स माहीत असतात. त्यांचा जनसंपर्क सुद्धा चांगला असतो. या रिक्षाचालकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले तर अनेक जीव वाचवता येतील हे लक्षात घेऊन ही योजना माझ्या सहकारी डॉक्टरांना सांगितली. त्यांनीही ती लगेच उचलून धरली. यातूनच येथील रिक्षाचालक व संघटनांशी संवाद साधून ही योजना सांगितले. जवळपास शंभर रिक्षाचालकांनी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेण्याच मान्य केले असून २८ जानेवारीला याबाबतच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. यात हृदयविकार आलेल्या रुग्णांसाठी सीपीआर देणे, अपघातातील जखमांतून होणारा रक्तस्त्राव थांबवणे, मोडलेल्या हाडांना आधार देणे, रुग्णाला हलवताना मणक्याला इजा होऊ न देणे, आकडी किंवा फेफरे आलेल्या रुग्णाला प्रथमोपचार देणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास देणे, भाजलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार, रेल्वे अपघातात कापले गेलेले हात, पाय योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर पुनर्जोडणीसाठी रुग्णाबरोबर रुग्णालयात पोहोचवणे आदीचा समावेश असेल. अशाचप्रकारे आगामी काळात बोईसर सारख्या औद्योगिक वसाहतीतील औद्योगिक अपघातांचा विचार ॲसिड व रासायनिक जखमा, फॅक्टरीमधील स्फोट, विषारी वायू गळती याचा विचार करून प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे डॉ. सोहोनी यांनी सांगितले.

डहाणू, बोर्डी, घोलवड, चिंचणी, चारोटी या गावांमधील रिक्षाचालकांना आम्ही प्रशिक्षण देणार असून प्रशिक्षित रिक्षाचालकांना जीवरक्षक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. हे प्रमाणपत्र रिक्षांच्या दर्शनी भागात लावू शकतील. त्यांना शर्टवर लावण्यासाठी बिल्लाही देण्यात येईल. पहिल्या शिबिरामध्ये साधारण १०० रिक्षाचालकांना प्रशिक्षण दिले जाईल. या उपक्रमासाठी आर्थिक पाठबळ देण्याची तयारी ‘अदानी फाउंडेश’ने दाखवली आहे. रुशिन पटेल, गुरुदत्त बिर्जे आणि अविनाश फाटक हे अदानी ग्रुपतर्फे सक्रिय आहेत. आयएमए डहाणूच्या वतीने सचिव डॉ. मकरंद बापट आणि खजिनदार डॉ. ज्योती बापट यांनी जबाबदारी घेतल्याचे डॉ. सोहोनी म्हणाले. यात एक अडचण आहे ती म्हणजे पोलिसांच्या सहकार्याची. अपघातातील जखमींना मदत केल्यानंतर रिक्षाचालकांना वारंवार जबाबासाठी, तसेच साक्षीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविल्यास त्यांचा रोजगार बुडू शकतो. त्यामुळे आम्ही येथील वरिष्ठ पोलिसांकडे हा विषय मांडणार असून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तसेच जीवरक्षक प्रमाणपत्र व बिल्ला असलेल्या रिक्षाचालकांना त्याची रिक्षा गरजेनुसार मदतीसाठी कोठेही उभी केल्यास पोलिसांनी दंडात्माक कारवाई करू नये, असाही मुद्दा रिक्षाचालकांनी मांडला आहे.

पाश्चात्य देशात अपघाताच्या वेळी पॅरामेडिकल्सना खूप महत्त्व असते. त्यांची टीम रुग्णवाहिका किंवा हेलिकॉप्टरमधून येते आणि रुग्णाला प्रथमोपचार देता देता रुग्णालयात पोहोचवते. भारताच्या ग्रामीण भागात अशी ‘ऑटो मेडिक्स’ रिक्षाचालकांची फळी उभारली गेली पाहिजे. या रिक्षांमध्ये फर्स्ट एड किट तसेच या जीवरक्षकांना रोख बक्षीस देऊन गौरविणे गरजेचे आहे. यबाबत संघटनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला जाईल, असेही डॉ. संजय सोहोनी यांनी सांगितले.