बुलढाणा जिल्हा भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात सापडलेला असताना त्यावर प्रभावी प्रशासकीय उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.बी.जी.वाघ यांची तडकाफडकी बदली केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. वाघ यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने राहिलेले असताना आता त्यांना अमरावती महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त या अकार्यकारी पदावर काम करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२ फे ब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्य़ातील दुष्काळ व पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी हवाई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षम व नियोजनशून्य कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करून जाहीर ताशेरे ओढले होते. जिल्हा प्रशासन दुष्काळी उपाययोजनांच्या बाबतीत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम न राबविता कागदोपत्री पोपटपंची करीत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आली होती. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या एकूणच कारभाराबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांना बुलढाण्याला पाठवून त्यांच्याकडून गोपनीय अहवाल मागवून घेतले. त्यानंतर बेधडक निर्णय घेत जिल्हाधिकारी वाघ यांच्यावर प्रशासकीय कार्यवाहीचा एक भाग म्हणून त्यांना अतिरिक्त आयुक्त या अकार्यकारी पदावर पाठविण्यात आले आहे. वाघ यांच्
या बदलीमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वाघ यांच्या नावावर संपूर्ण प्रशासकीय कारभार चालविणाऱ्या काही सल्लागार उपजिल्हाधिकाऱ्यांचे त्यामुळे धाबे दणाणले आहे. हे अधिकारी वाघ यांना चुकीचे मार्गदर्शन करून प्रशासनावर नियंत्रण ठेवून आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना चुकीचे व अप्रशासकीय निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या या अधिकाऱ्यांनासुद्धा बदलीवर जिल्ह्य़ाबाहेर व अकार्यकारी पदावर पाठवावे, अशी मागणी आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी बदलले आणि दुष्काळ व पाणीटंचाईसंदर्भात प्रभावी उपाययोजना होऊ शकल्या नाहीत तर  जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीने काही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने व्यक्त केली.
ते म्हणाले की, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या घरची मुख्यमंत्र्यांची भोजनावळी जिल्हाधिकारी बी.जी.वाघ यांना चांगलीच महागात पडली.
किरण कुरुंदकर तातडीने रुजू
वाघ यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुरुंदकर यांना बुलढाण्यात तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी असून प्रथम समकक्ष पदोन्नतीने ते बुलढाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत. दुष्काळ व पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासोबत ढेपाळलेल्या जिल्हा प्रशासनावर सक्षम नियंत्रण व अंकुश ठेवण्याची जटिल जबाबदारी त्यांना निभावावी लागणार आहे.