लातूर शहरासाठी मिरजेहून २५ वाघिणी असलेली २५ लाख लीटरची जलदूत रेल्वे बुधवारी सकाळी ८ वाजता दाखल झाली. रेल्वेने २५ लाख लिटर पाण्याची वाहतूक करण्याची देशामधील अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.
१२ एप्रिलला १० वाघिणी घेऊन ५ लाख लिटर पाणी लातूरला पोहोचले. त्यानंतर मंगळवापर्यंत ९ खेपांमध्ये ४५ लाख लिटर पाणी पोचले. मंगळवारी रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी ५० वाघिणी घेऊन रेल्वे लातूरकडे निघाली. ती सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लातुरात पोहोचली. ८ वाजून २० मिनिटांनी ५० टँकरमधील पाणी उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पाणी उतरवून विहिरींपर्यंत नेण्यासाठी ८५० मीटर लांबीची जलवाहिनी बसवण्यात आली आहे. रेल्वेतील पाणी विहिरीत टाकले जात असून, तेथून २० अश्वशक्तीच्या दहा मोटारींनी तासाला साडेचार लाख लिटर पाणी उचलले जात आहे.
आठ टँकरमध्ये एकाच वेळी पाणी भरण्याची सोय करण्यात आली असून, २ किलोमीटर अंतरावरील आर्वी जलशुद्धीकरण केंद्रात टँकरने पाणी टाकले जात आहे. विहिरीपासून आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पीव्हीसी जलवाहिनी बसवण्याचे कामही गतीने सुरू आहे.
शहरात एकाच वेळी २५ लाख लिटर पाणी पहिल्यांदाच रेल्वेने प्राप्त झाले. बुधवारी आलेल्या पाण्याच्या रेल्वेचे सारथ्य मुख्य मोटारमन सुनील खोत व सहायक मोटारमन बी. जे. पोळेकर यांनी केले. रेल्वेस्थानकावर महापौर अख्तर शेख, उपविभागीय अधिकारी डॉ. प्रताप काळे, प्रकाश खपले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उपस्थित होते. सोलापूर येथील दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अजय दुबे, मनिंदरसिंह उप्पल, आर. के. शर्मा, नर्मदेश्वर झा, तसेच लातूर रेल्वे स्थानकप्रमुख बी. के. तिवारी जलदूतशी संबंधित सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत. दररोज २५ लाख लीटरची रेल्वे लातूरला मिरजेहून आणण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

‘वितरणातील विस्कळीतपणा दूर’
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भंडारवाडी जलसाठय़ातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. माळकोंडजी येथील पाणी आणणाऱ्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते पाणीही गेल्या आठवडाभरापासून मिळत नव्हते. डोंगरगाव येथील मिळणारे २५ लाख लिटर, साई बंधाऱ्यातून मिळणारे २ लाख लिटर व रेल्वेचे ५ लाख लिटर असे केवळ ३३ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पाणी वितरणात अडचणी येत होत्या. आता रेल्वेचे २५ लाख लिटर व बेलकुंड येथून दररोज २५ लाख लिटर किमान पाणी टँकरद्वारे उपलब्ध होईल. शहराला ७२ लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध झाल्यास टँकर वाढवून पाणी वितरणातील विस्कळीतपणा दूर होईल, असे महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पत्रकारांना सांगितले.
रेल्वेमंत्री प्रभू-आ. देशमुख चर्चा
२५ लाख लीटरची जलदूत लातूरला पोहोचल्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आमदार अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर लातूरच्या पाणीप्रश्नी चर्चा केली. लातूरकरांना किती दिवसांनी पाणीपुरवठा होतो, तसेच रेल्वेने पाणी येत असल्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, याचीही त्यांनी विचारणा केली. अतिशय अडचणीत असताना रेल्वेने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल लातूरकर समाधानी असून, पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची विनंती आमदार देशमुखांनी केली. त्यावर प्रभूंनी ‘काळजी करू नका, अडचणी सांगत चला,’ असे सांगून दिलासा दिला.

thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Loss of crops on three and a half thousand hectares due to unseasonal rain
बुलढाणा : ‘अवकाळी’चा शंभर गावांना फटका, साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी; ३०९ घरांची पडझड
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द