दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्हय़ात सध्या विविध राजकीय पक्षांचे नेते व माध्यमांच्या प्रतिनिधींचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. परंतु निमित्त दुष्काळाचे असले तरी प्रत्यक्षात पर्यटनच जास्त, अशीच या दौऱ्यांबाबत आता चर्चा होऊ लागली आहे!
अनेक पुढारी दुष्काळाची पाहणी करण्यास या जिल्हय़ात येतात. परंतु जनतेला दिलासा देणारे निर्णय आणि त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नसल्याने जालना हा एक प्रकारे दुष्काळी पर्यटन जिल्हा झाला आहे काय? हा प्रश्न मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनाच पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. अर्थात, भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष असल्याने दुष्काळी भागास भेट देऊन सरकारला आवश्यक सूचना करणे हे आमचे कर्तव्यच असल्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळाले.
जालना जिल्हय़ाची हद्द औरंगाबाद विमानतळापासून २५ किलोमीटर अंतरावर सुरू होत असल्याने औरंगाबादमधील बडय़ा हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून जालना जिल्हय़ाचा दौरा करता येतो. विविध राजकीय पक्षांचे नेते जालना दौऱ्यावर येतात. आम्ही दौऱ्यावर आलो, परंतु अमुकतमुक पक्षांचे नेते का आले नाहीत, असा जाहीर प्रश्नही आपल्या राजकीय विरोधकांना विचारण्याची संधी साधून घेतात. राजनाथसिंह यांनीही या जिल्हय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यास पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री अजून का आले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला.
विविध पक्षांचे प्रमुख पुढारी दौऱ्यावर येताना अनेक गावांना भेटी देतात. त्यात त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांच्या गावांचाही समावेश असतोच. राजनाथसिंह यांनी जालना जिल्हय़ातील भाकरवाडी गावास भेट दिली व भोकरदन येथे जाहीर सभा घेऊन तेथेच रात्री मुक्काम केला. भोकरदन हे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांचे गाव. हा सगळा परिसर दानवे यांच्याच प्रभावक्षेत्राखालचा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जिल्हय़ाच्या दुष्काळी दौऱ्यावर येऊन गेले आणि दुष्काळात आपण राजकारण करीत नाही, हा संदेश जनतेत जावा, यासाठी त्यांनी दौऱ्यात भाजप खासदार दानवे यांनाही सोबत घेतले. या दौऱ्यात पवार यांनी दोन मोसंबी बागांची पाहणी, रोजगार हमीच्या एका कामास भेट आणि दुष्काळी जनतेशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात यातले चार कार्यक्रम झाले!
मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व खरीप-रब्बी हंगामातील पिके हातची गेल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांचा दौरा महत्त्वाचा होता. राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट व अन्य वरिष्ठ कृषी अधिकारी त्यांच्यासोबत होते. विखे यांनी दौऱ्यात काही गावांना भेटी दिल्या, परंतु त्यात आवर्जून अंबड तालुक्यातील कर्जत या दुष्काळी गावाचा समावेश होता. कर्जत हे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भीमराव डोंगरे यांचे गाव.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सभा दुष्काळी जालना जिल्हय़ात झाल्या. या दोघांचेही वैशिष्टय़ म्हणजे दुष्काळी भागाची पाहणी करण्याऐवजी थेट जालना शहरात सभेच्या व्यासपीठावर येणेच त्यांनी पसंत केले. उद्धव ठाकरे सकाळी जालना शहरात येऊन थांबले आणि दुपारी सरळ सभेच्या ठिकाणी पोहोचले. त्याच दिवशी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर सभापती असलेल्या जालना बाजार समितीने शहरातच सुरू केलेल्या जनावरांच्या छावणीचे उद्घाटनही झाले. परंतु ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नव्हे तर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते! उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर बरोबर महिन्याने त्याच ठिकाणी मनसेचे राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. त्यांचा मुक्काम औरंगाबादला होता आणि सभेच्या वेळेपुरते ते जालना शहरात येऊन गेले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या आठवडय़ात भाजपचे नेते जालना शहरात आले असताना दुष्काळी दौरे कशाला काढता? त्याऐवजी उपाययोजना करण्यासाठी अशा जिल्हय़ांची बैठक घ्यावी, अशी सूचना त्यांनी सरकारला केली होती. परंतु त्यानंतर आठवडाभरातच त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जालना जिल्हय़ाच्या दौऱ्यावर आले आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री दौरा का करीत नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला. दुष्काळी जालना जिल्हय़ात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, तसेच मंत्री नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मधुकर पिचड यांच्यासह इतरांचे दौरेही झाले आहेत. जालना शहराच्या नवीन पाणीयोजनेची चाचणी सध्या चालू असून तिच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येण्याची शक्यता सध्या जिल्हय़ातील काँग्रेस पक्षाच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मागील खरीप हंगामात पन्नासपेक्षा कमी पैसेवारीची मराठवाडय़ातील ३ हजार २९९ गावे राज्य सरकारने ९ जानेवारीला जाहीर केली. राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्हय़ातील सर्व ९७० गावांचा यात समावेश होता. खरिपाच्या अंतिम पैसेवारीत ५०पेक्षा  अधिक पैसेवारीचे एकही गाव नसलेला हा मराठवाडय़ातील एकमेव जिल्हा. मात्र, त्यामुळेच विविध राजकीय पक्षांचे नेते व माध्यम प्रतिनिधींचे दौरे जालन्यात सुरू झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onजालनाJalna
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought in jalna distrect
First published on: 03-04-2013 at 03:54 IST