जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात दारूच्या नशेत असताना झालेल्या किरकोळ वादातून एकाने आपल्या सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, हुडको परिसरात मातंगवाडय़ात प्रल्हाद मरसाळे कुटूंब राहते. जय (३५) आणि दीपक (२५) हे दोघे भाऊ एकत्र राहत होते. जयला दारुचे व्यसन होते. यावरून घरात नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी रात्री जय आणि दीपक यांनी घरी सोबत जेवण केले. रात्री जय दारू पिवून आला होता. दोघा भावांमध्ये किरकोळ वाद झाला. मध्यरात्रीच्या सुमारास जयने लहान भाऊ दीपकला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार लपविण्यासाठी त्याने दीपकला पंख्याला लटकवले.
शनिवारी सकाळी वडील प्रल्हाद उठल्यावर यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केली असता दीपकने आत्महत्या केल्याचे जयने सांगितले. दीपकच्या डोक्यातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. यामुळे ही आत्महत्या नव्हे, तर खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर जयने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.