नीरज राऊत
आयातबंदीमुळे दरांत चार पटींनी वाढ; फराळासाठी सुकामेव्यातून वगळली जाणार
पाकिस्तानातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्यात आल्याने पाकिस्तानमधून येणारी खारीक, खजूर आणि सैंधव (काळे मीठ) गेल्या महिन्यापासून बाजारामधून गायब झाले आहे. खजुराचा साठा सध्या उपलब्ध असला तरी खारकेचे दर मात्र चार पटींनी वाढले आहेत. यामुळे दिवाळीमध्ये भेटवस्तू स्वरूपात देण्यात येणाऱ्या सुकामेवाच्या पुडय़ांमधील खारीक तुकडे यंदा वगळले जाण्याची शक्यता आहे.
इतर वेळी १०० रुपये प्रति किलो या दराने मिळणारी खारीक सध्या ४०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांनी खारीक खरेदी करणे कमी केले आहे. देवपूजेसह, देवीला वाहण्यात येणारी ओटी तसेच डिंकाचे लाडू यात खारकेचा वापर होतो. खारकेची पावडर लहान मुलांसाठी शक्तिवर्धक असल्याने दुधामध्ये किंवा खिमटी व अन्य खाद्यपदार्थामध्ये याचा वापर करण्यात येतो.
खारकेसह खजूर व सैंधवचा बाजारामध्ये तुटवडा भासत आहे. खजुराचे दर प्रतवारीनुसार ८० ते ३०० रुपये किलो इतके असले तरी आगामी काळात यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
झाले काय?
* पाकिस्तानबरोबरील तणावपूर्ण संबंधांमुळे तेथून आयात होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
* यामुळे खारीक, खजूर व सैंधव यावर अतिरिक्त कर लागल्याने त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
* पाकिस्तानमधून भारतीय बाजारपेठेत थेट दाखल होणारे हे पदार्थ आता पाकिस्तानातून येमेन व तेथून भारतात येत असल्याने किमती वाढल्या आहेत.
पाकिस्तानमधून येणारी खारीक व त्याचा तुकडा आयात होण्यास निर्बंध आल्याने बाजारपेठेत सध्या खारकेची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे खारकेचे दर काही पटींनी वाढले आहेत. खारीक आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे असलेल्या साठय़ातून खारकेची सध्या विक्री केली जात आहे. खारकेसोबत, खजूरही पाकिस्तानातून आयात करण्यावर बंदी आणण्यात आली असली तरी इतर देशांतून खजूर येत असल्याने खजुराचे भाव स्थिर राहिले आहेत.
– जयंती खंडेलवाल, भवानी ड्रायफ्रूट, पालघर