शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूक खर्चाच्या हिशोबासाठी बँकेत खाते उघडले. तसेच एक कच्चा अर्ज भरला. यापूर्वी सर्व तांत्रिक प्रक्रिया त्यांनी पार पाडल्या.
खासदार वाकचौरे यांनी नगरच्या एका हिशोब तपासनिसाकडे जाऊन डमी अर्ज भरण्याची रंगीत तालीम केली. उद्या अर्ज भरताना केवळ आठ लोकांनाच उमेदवारांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जाता येणार आहे.
आयोगाने खर्च दाखल करण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे आता निवडणूक खर्चासाठी बँकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यापूर्वी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे खासदार वाकचौरे यांनी आज स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या शिर्डी शाखेत खाते उघडले. उमेदवारास दररोज खर्च दाखल करावा लागणार आहे. तसेच उमेदवारासोबत आयोगाचे एक पथक राहणार आहे. उमेदवाराला २४ तासांच्या आत खर्च सादर करावा लागणार आहे. तसेच दररोज ऑनलाइन पद्धतीने खर्चाची माहिती द्यावी लागणार आहे. पूर्वी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागत असे. पण आता नमुना नं. २६ मध्ये गुन्हे, अपत्य व संपत्ती याचे एकत्रित प्रतिज्ञापत्र आहे. आयोगाने अनेक बदल केले असून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.