कर्मवीर भाऊराव पाटील यांची ‘कमवा आणि शिका’ ही तत्त्वप्रणाली अंगी बाणवल्यामुळेच नवनाथ गव्हाणे यांना केंद्रीय लोकसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून त्यांनी कर्मवीरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आता बहुजन समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा रयत सेवक सहकारी बँकेच्या पंढरपूर शाखेचे प्रमुख विजयकुमार डुरे-पाटील यांनी व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे (रिधोरे) मुख्याध्यापक कोंडिबा गव्हाणे यांचे चिरंजीव नवनाथ गव्हाणे हे नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चमकले. त्यानिमित्त रिधोरे येथे न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात नवनाथ गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य अनिल ननवरे, अनुरथ जाधव, विजयकुमार मिसाळ, सुनील सोनवणे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नवनाथ गव्हाणे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेत लहानपणी झालेले शिक्षण व त्यातून घडलेले संस्कार पुढे आयुष्यात खूप मोलाचे ठरले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करताना उपेक्षित व वंचित समाजाच्या मुलांना पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत, हे जवळून अनुभवता आले व पाहता आले. परंतु कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी जिद्द व चिकाटी व मेहनतीने जीवनात यशाचा मार्ग सापडतोच. दहावी व बारावी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाल्यानंतर पुढे आत्मविश्वास बळावला. वैद्यकीय शिक्षण घेतले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नायब तहसीलदार झालो. परंतु आत्मविश्वास दुणावला आणि मोठी स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल ठेवली असता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाने गवसणी घातली, अशा शब्दात नवनाथ गव्हाणे यांनी यशाचे गुपित उघड केले. कर्मवीर भाऊराव पाटीव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्याविषयी कृतज्ञतेचा भावही त्यांनी व्यक्त केला. सुनील सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापक कोंडिबा गव्हाणे यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earn and learn principle system fallow in solapur
First published on: 21-05-2016 at 00:05 IST