अहिल्यानगर: नगर अर्बन सहकारी बँकेतील (बहुराज्यीय) घोटाळ्यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात ८ जुलैला पाचारण करण्यात आले होते, तर आता बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांनाही १६ जुलैला पुरावे घेऊन सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
अर्बन बँकेच्या कर्जवितरणात २९१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपावरून फेब्रुवारी २०२२ मध्ये बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. कोतवाली पोलिसांनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी व कर्जदार अशा १०५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तो तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास फारसा गांभीर्याने केला नसल्याच्या तक्रारी आहेत. या व्यतिरिक्त ३ कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळा, २२ कोटी रुपयांचा पिंपरी-चिंचवड शाखेतील घोटाळा, शेवगाव शाखेतील ५ कोटी ३० लाख रुपयांचा सोनेतारण घोटाळा असे चार गुन्हे दाखल झालेले आहेत.
कर्ज वितरण व कर्जवसुलीबद्दल संचालक मंडळावर ठपका ठेवत भारतीय रिझर्व बँक तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाने बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार गोठवले, तरीही संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीत बदल न झाल्याने ४ नोव्हेंबर २०२३ रोजी बँक परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर बँकेवर अवसायक म्हणून केंद्रीय वित्त मंत्रालयातील गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली.
डीआयजीसीच्या माध्यमातून बँकेने ठेवीदारांच्या रकमा परत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्ज वसुली न झाल्याने थकीत कर्जाची रक्कम ७०० कोटींवर जाऊन पोहोचली आहे.
अर्बन बँकेतील घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने व बँक बहुराज्यीय असल्यामुळे ईडीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. बँक अवसायनात जाण्यापूर्वी, अलीकडच्या काळात भाजपच्या वर्चस्वाखाली होती. बँकेवर कारवाई झाली त्यावेळी माजी खासदार दिलीप गांधी अध्यक्ष होते. नंतर त्यांचे निधन झाले.