विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय मूल्यमापनात विद्या प्राधिकरणाने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकाच बंधनकारक करण्यात आल्या असून शिक्षकांनी स्वत: तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेस मनाई करण्यात आली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रगती चाचण्या होत आहेत. प्रथम भाषा व गणित या दोन विषयांसाठी तीन प्रगती चाचण्या ठेवण्यात आल्या. पहिली म्हणजे पायाभूत चाचणी २८ व २९ जुलै २०१६ला व दुसरी १९ व २० ऑक्टोबर २०१६ला झाली. आता तिसरी चाचणी ६ व ७ एप्रिलला होणार आहे.
पहिल्या दोन चाचण्यांच्या पाश्र्वभूमीवर तिसऱ्या चाचणीसाठी काही बदल करण्यात आले आहे. त्यात प्रमुख बदल म्हणजे आता प्रश्नपत्रिका राज्य पातळीवरून पुरवठा होणार आहे. पहिली ते आठवीच्या नियमित मूल्यमापनानुसार चाचणीसाठी भाषा व गणित विषयाच्या प्रष्टद्ध प्रश्नपत्रिका राज्यपातळीवरून आता देण्यात येणार आहेत. पूर्वीच्या दोन चाचण्यांप्रमाणे शिक्षकांनी तयार केलेल्या प्रष्टद्ध प्रश्नपत्रिका उपयोगात आणता येणार नाहीत.
प्राप्त माहितीनुसार, पूर्वीच्या चाचण्यात शिक्षकांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका गोंधळाचे कारण ठरल्या होत्या. काहींचे आकलन होत नव्हते तर काही प्रश्नपत्रिका, विषयाबाहेरच्या माहितीच्या आधारे तयार केल्याची ओरड झाली होती. काही जिल्ह्य़ात शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार करण्यात गांभीर्य दाखविले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खरे मूल्यमापन झालेच नसल्याचा निष्कर्ष पुढे आला. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम पहिल्या दोन चाचण्यांच्या बाबतीत फ सवाच ठरला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिध्द करण्याची बाब कसोटीवर उतरली नाही, असेही म्हंटले गेले.
या पाश्र्वभूमीवर विद्या प्राधिकरणचे संचालक धीरज कुमार (पुणे) यांनी चाचणीत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आता तिसऱ्या चाचणीसाठी प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक ठरले आहे. या प्रश्नपत्रिकाच्या आधारे झालेल्या चाचण्यांतील गुणांची नोंद नियमित मूल्यमापन नोंदवहीत करावी लागणार आहे. त्याआधारे प्राप्त श्रेणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकात नोंदविण्याची सूचना आहे. या प्रश्नपत्रिका १९ मार्चपासून प्रत्येक जिल्ह्य़ात पाठविण्यास सुरुवात झाली. परीक्षेच्या तीन दिवस पूर्वी शाळास्तरावर त्याचे वाटप होईल. सदर तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी चाचणी यशस्वी होण्यासाठी जागृती करण्याचेही निर्देश आहेत. तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आवश्यक ते साहित्य जमा किंवा तयार करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर आहे. जिल्हा, तालुका व शाळास्तरावर या प्रश्नपत्रिका खराब होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले.