प्रथमदर्शनी एकनाथ खडसे दोषी! वकील असीम सरोदेंचा दावा

“खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात”, असं वकील असीम सरोदे म्हणाले.

खडसेंनी आपल्या पदाचा गैरवापर केला. हे स्पष्टपणे मनी लॉन्ड्रींगचं प्रकरण असल्याचं वकील असीम सरोदे म्हणाले. (Photo : File)

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) देखील या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता पुण्याचे प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी आपलं मत मांडलं आहे. “खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात. हे मनी लॉन्ड्रींगचं प्रकरण आहे. याकरिता खडसेंनी आपल्या पदाचा देखील गैरवापर केला असून प्रथमदर्शनी एकनाथ खडसे या प्रकरणात दोषी आढळतात”, असं असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे. सरोदे यांनी व्हिडिओमार्फत खडसे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर भाष्य करत हे दावे केले आहेत.

काय म्हणाले असीम सरोदे?

वकील असीम सरोदे म्हणाले की, “एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात. कोणत्याही वकिलाने, कायदे तज्ञाने खडसेंच्या भोसरी जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रं पाहिली तर त्यांना पैसे कुठून आले? म्हणजेच त्य्नाचे जावई चौधरी आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात जमा झालेले पैसे नेमके कुठून आले याचा प्रवास जर आपण पहिला तर स्पष्टपणे दिसतं की हे मनी लॉन्ड्रींगचं प्रकरण आहे. म्हणून, अन्य न्यायालयीन यंत्रणा आणि ED कडून खडसेंच्या चौकशी, तपास सुरु करण्यात आला आहे.

हे मनी लॉन्ड्रींगच, खडसेंनी पदाचा दुरुपयोग केलाय!

“कोणत्याही यंत्रणेचा राजकीय हेतूसाठी वापर व्हायला नको. त्याचबरोबर, सूडाच्या हेतूने कोणावर तरी कायदेशीर प्रक्रिया करायची असं देखील व्हायला नको, असं मला वाटतं. परंतु, एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मला हे नक्की दिसतं की, इथे मनी लॉन्ड्रींग झालेले आहे. पैशांची अफरातफर वा पैसे अनेक ठिकाणांहून आणून एका जागी जमा करणे, त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांनी आपण मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करणे, आपल्या सोयीसाठी काही शासकीय निर्णय फिरवणे या सगळ्या घडामोडी केलेल्या आहेत हे या प्रकरणात दिसतं,” असं असीम सरोदे स्पष्ट नमूद करतात.

प्रथमदर्शनी खडसे दोषी!

“संपूर्ण प्रकरण पाहता एकनाथ खडसे हे प्रथमदर्शनी तरी दोषी आहेत, असं आपण म्हणू शकतो. मात्र, कायद्याच्या योग्य प्रक्रियेतून याबाबतचा निर्णय झाला पाहिजे”, असंही यावेळी असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून निश्चितच एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यापुढे हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार? त्याचप्रमाणे यात खडसेंच्या पक्षाची अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका राहणार यासह अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Eknath khadse guilty first sight bhosari land scam lawyer asim sarode claims gst