शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर कथितप्रकारे बंड केलं आहे. ते सध्या गुजरातमधील सुरत येथील एका हॉटेलमध्ये आहेत. त्यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर काही वेळापूर्वी सुरतमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून जवळपास ४० मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान, नार्वेकर यांच्या फोनवरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील संवाद झाल्याची माहिती समजत आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. मी आतापर्यंत पक्षाविरोधी कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे मला गटनेते पदावरून का काढण्यात आलं असा सवाल एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं देखील समजत आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील नाराजी व्यक्ती केल्याची माहिती समजत आहे. संजय राऊत प्रत्यक्षात एक आणि माध्यमांत दुसरं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मला मुख्यमंत्री पदाची कोणतीही लालसा नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपात युती व्हावी, यात गैर काय आहे? मी अद्याप कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नाही. कोणताही वेगळा गट स्थापन केला नाही. कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही. तरीही माझ्यावर कारवाई का झाली? असे अनेक सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारल्याची माहिती समजत आहे. काही वेळाच एकनाथ शिंदे आपली अधिकृत भूमिका मांडणार असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मुंबईत या, आपण समोरासमोर चर्चा करू, चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेऊ, सर्वकाही सुरळीत होईल, तुम्ही चिंता करू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याचं समजत आहे.