Eknath Shinde Jai Gujarat Slogan: पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. या घोषणेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या पोटातलं आज ओठावर आलं. तर काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही शिंदेंवर टीका केली. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्यातील कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, गुजराती बांधवांनी समाजाच्या हितासाठी पुण्यात एक मोठे संकुल उभारले आहे. त्याच्या उद्घाटनासाठीच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपस्थित राहिलो होतो. मी भाषणाच्या शेवटी नेहमी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणत असतो.
“आजच्या कार्यक्रमात मी जय गुजरात म्हणालो. कारण माझ्यासमोर उपस्थित असलेल्या समुदायाने वर्षांनुवर्ष-पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राला कर्मभूमी मानत काम केले. पुण्यात त्यांनी उभे केलेले संकुल सर्वांसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी मी ‘जय गुजरात’, असे म्हणालो. मराठी हा आमचा श्वास आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे. मराठीबद्दल माझ्यावर जे टीका करत आहेत, त्यांनी आधी स्वतःकडे पाहावे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओही दाखवला. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली होती. याचबरोबर वरळी येथे आदित्य ठाकरे यांनी ‘केम छो वरळी’, असे बॅनर लावल्याचीही आठवण एकनाथ शिंदे यांनी यावेळी करून दिली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
पुण्यातील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करताना म्हटले, “अमित शाह हे गुजराती असले तरी ते महाराष्ट्राचे जावई आहेत. ते होम मिनिस्टर असले तरी त्यांच्या घरातील होम मिनिस्टर आपल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात. महाराष्ट्र आणि गुजरातने विकास, उद्योग, संस्कृतीच्या क्षेत्रात देशाला नेहमीच दिशा दाखवली आहे.” यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसाठी एक शेर ऐकवून दाखवला आणि भाषणाचा शेवट करताना ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली.