राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सगळं कसं जमून आलं? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. आधी सूरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा ते मुंबई असा या बंडखोर आमदारांचा प्रवास चर्चेत होता. मात्र, त्याहून जास्त चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त बैठकांची झाली. रात्री-अपरात्री या बैठका होत होत्या, असं खुद्द एकनाथ शिंदेंनी विधानसभेतल्या भाषणात सांगितलं होतं. फडणवीस वेश बदलून बैठकीसाठी येत असल्याचीही चर्चा रंगली. पण हे सगळं कसं घडलं? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच, फडणवीसांऐवजी आपल्याला मुख्यमंत्रीपद कसं मिळालं? या प्रश्नावरही त्यांनी भूमिका मांडली आहे.

“मुख्यमंत्रीपदासाठी ‘कार्यक्रम’ केलाच नव्हता”

हा सगळा सत्ताबदलाचा कार्यक्रम आपण मुख्यमंत्रीपदासाठी केलाच नव्हता, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. “मित्रपक्षांच्या कारवायांमुळे शिवसेनेचे आमदार त्रस्त झाले होते. मतदारसंघात मित्रपक्षाकडून नारळ वाढविण्यात येत होते. यामुळेच आमदार बिथरले होते. पोलिसांच्या खोटय़ा केसेस, तडीपारी हे सारे सुरू झाले होते. एकाला तर काहीही कारण नसताना मोक्का लावण्यात आला. हे अतिच झाले होते. मी हे सारे तेव्हाच्या मुख्यमंत्र्याच्या कानावर घातले होते. माझ्या खात्याच्या बाबतीत असेच घडत होते. पण मी त्यांना पुरून उरायचो. त्यांचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यक्रम करून टाकायचो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मुख्यमंत्रीपद जाईल या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी..”

भाजपासोबत युती केली तर आपल्या मुख्यमंत्रीपदाचं काय होणार? या भीतीमुळेच उद्धव ठाकरेंनी युती केली नाही, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे. “आमदारांमधील नाराजी वाढत होती. त्यांचा कडेलोट व्हायचा. भाजपबरोबर युती करू या म्हणून मी चार ते पाच वेळा शिवसेना नेतृत्वाला भेटलो. साऱ्यांच्या भावना कानावर घातल्या. भाजपबरोबर युती केल्यास माझ्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचे काय हा प्रश्न त्यांना होता. कारण भाजपबरोबर युती केली असती तर मुख्यमंत्रीपदाला ‘ब्रेक’ लागला असता. ते त्यांना मान्य नव्हते. शेवटी आमदारांचा एवढा कडेलोट झाला होता की माझाही नाइलाज झाला”, असं ते म्हणाले.

Video : “माझ्यामुळे त्यांनाही पुण्य मिळालं, मी अजित पवारांना म्हटलं अर्ध पुण्य…”, एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री-अपरात्री होणाऱ्या ‘त्या’ बैठका!

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री-अपरात्री होणाऱ्या बैठकांचा उल्लेख केला. “तो सारा काळ वेगळाच होता. आम्ही सत्ताधारी होतो. सारा फोकस आमच्यावर असायचा. अशा परिस्थितीत ‘मिशन’ किंवा ‘ऑपरेशन’ सोपे नव्हते. पण आम्ही भेटायचो, बोलायचो. बोलल्याशिवाय कसे होणार? प्रत्यक्ष भेटी वारंवार व्हायच्या. साताऱ्याला ते कधीच आले नव्हते भेटायला. दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते. कारण आमचे दूरध्वनी टॅप होत असत”, असं ते म्हणाले.