पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात विरोधी पक्ष एकवटले आहे. भाजपाप्रणित एनडीएविरोधात विरोधकांच्या इंडिया आघाडीची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठीच इंडिया आघाडीतले २८ पक्ष आज मुंबईत एकत्र येत आहेत. देशभरातील २८ पक्षांचे नेते, सहा राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या दोन दिवसीय (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) बैठकीसाठी मुंबई विमानतळावर दाखल होऊ लागले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीवर विरोधी पक्षांकडून टीका सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील इंडिया आघाडीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांना रावण म्हटलं आहे. अहमदनगरच्या राहता तालुक्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ शिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या कार्यक्रमाला हजर आहेत. या कार्यक्रमावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज मुंबईत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. कशाला आलेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कसं लढावं यावर चर्चा करायला एकत्र आले आहेत. मी त्यांना सांगेन, आग से मत खेलो, नहीं तो आपके हात जल जाएंगे (आगीशी खेळू नका, अन्यथा तुमचे हात भाजतील). काल-परवा कोणीतरी सांगितलं पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे त्यांनी सांगावं. खरंतर, अनेक चेहरे कोणाला असतात हे तुम्हाला माहिती आहे. अनेक चेहरे हे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि इकडे आपण सगळे जय श्री रामवाले रामभक्त आहोत.

हे ही वाचा >> “इंडिया’च्या बैठकांवर पैशांची उधळपट्टी”, भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, “सुरत-गुवाहाटीचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीकडून बुधवारी (३० ऑगस्ट) पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. परंतु, भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केलं? सर्वांनीच त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात आपण पाहिलंच आहे, त्यांना कसलंच यश मिळालं नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही.”