मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले असून शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवल्याचे वृत्त फिरत आहे. एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.  

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या खोडसाळ मेसेज आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही विनंती.”

मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. “गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल”, अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात नमूद केले होते.