scorecardresearch

पारनेर नगरपंचायत त्रिशंकू; माजी सभापती जयश्री औटींचा पराभव

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला आहे.

पारनेर नगरपंचायतींच्या निवडणूक मतमोजणीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.

नगर : पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ७, शिवसेनेला ६, शहर विकास आघाडीला २ तर भाजप व अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शहर विकास आघाडी व अपक्षावर विसंबून राहावे लागणार आहे.  पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती व माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे शहराध्यक्ष नीलेश खोडदे यांच्या पत्नी स्वाती खोडदे, माजी उपनगराध्यक्ष व शहर विकास आघाडीचे नेते चंद्रकांत चेडे, त्यांच्या पत्नी आशा चेडे यांच्यासह विद्यमान नगरसेवकांपैकी विजेता सोबले, मालन शिंदे, विशाल शिंदे, मयुरी औटी, सुनंदा शेरकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार- सुप्रिया शिंदे (प्रभाग २), नितीन अडसूळ (प्रभाग ५), राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार निता औटी (प्रभाग ६), हिमानी नगरे (प्रभाग ९), डॉ. विद्या कावरे (प्रभाग १२), विजय औटी (प्रभाग १३), प्रियांका औटी (प्रभाग १७).  शिवसेनेचे विजयी उमेदवार-शालूबाई ठाणगे (प्रभाग १), नवनाथ सोबले (प्रभाग ४), विजया गंधाडे (प्रभाग ७), निता ठुबे (प्रभाग १४), जायदा शेख (प्रभाग १५), युवराज पठारे (प्रभाग १६).

भाजपचे विजयी उमेदवार- अशोक चेडे (प्रभाग ११), शहर विकास आघाडीचे विजयी उमेदवार-भूषण शेलार (प्रभाग ८), सुरेखा अर्जुन भालेकर (प्रभाग १०), अपक्ष- योगेश मते (प्रभाग ३)

  • विधानसभेचे माजी उपसभापती, माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी, पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री औटी यांना प्रभाग ९ मध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीच्या सर्वात तरुण व नवख्या उमेदवार हिमानी नगरे यांनी श्रीमती औटी यांचा १२ मतांनी पराभव केला. हिमानी नगरे या जायंट किलरह्ण ठरल्या. तत्कालीन पारनेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाळासाहेब नगरे यांच्या हिमानी या कन्या आहेत. 
  • विद्यमान १७ नगरसेवकांपैकी ६ नगरसेवकांनी या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावले होते. मात्र या नगरसेवकांपैकी माजी सभापती सुरेखा भालेकर यांनाच केवळ मतदारांनी स्वीकारले. प्रभाग दहा मधून त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा ९० मतांनी पराभव करून विजयी झाल्या.
  • प्रभाग १६ मधील शिवसेनेचे युवराज पठारे उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार औटी यांचा ३८६ मतांनी पराभव केला. या प्रभागात झालेल्या ६५५ मतदानापैकी निम्म्यापेक्षा जास्त ४९६ मते मिळवून पठारे विजयी झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election nagar panchayat defeat former speaker ysh