नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांचे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान पुणे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सीपीआय माओवादीकडून एल्गार परिषदेला पैशांचा पुरवठा करण्यात आला असून परिषदेमार्फत जनतेला भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही सांगितलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून यावेळी पेन ड्राईव्ह, कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत विविध पुरावे हाती लागले असून तपासात ई-मेल्स, पत्र असे भक्कम पुरावे हाती लागले आहेत. एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरोधात जनतेला भडकवण्याचे नियोजन होते याचेही पुरावे हाती आले आहेत असं पोलिसांनी सांगितलं. यावेळी पोलिसांनी आरोपी वरवर राव नेपाळमधून शस्त्र विकत घ्यायचा अशी माहिती दिली आहे.

हाती आलेल्या इलेक्ट्रिक पुराव्यांची पाहणी केली असता प्रतीबंधित सीपीआय-माओवादी संघटनेने व्यूहरचना आणि रणनीतीचा भाग म्हणून भारतात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचला आहे. अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव सीपीआय माओवादीच्या ईस्टर्न रिजनल ब्यूरोच्या बैठकीत संमत झाला आहे, आणि त्याबद्दल पुरावा उपलब्ध आहे अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

ईस्टर्न रिजनल ब्यूरो सीपीआय माओवादीचा एक भूमिगत गट आहे. याच कटाचा भाग म्हणून महाराष्ट्रात एक फ्रंट तयार करण्याच्या दृष्टीने पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. सीपीआय माओवादीने रचलेल्या कटात सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांचा स्पष्ट सहभाग असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सीपीआय माओवादीच्या सदस्यांकडून बेकायदेशीर कृत्यांकरिता निधी जमवणे, शहरी भागातील विद्यार्थ्यांना, तरुणांना भडकावणे, शस्त्र जमवणे याबद्दलचा पुरावा उपलब्ध झाला आहे. या कटात वरिष्ठ सदस्यांचाचा सहभाग असल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं सांगण्यात आलं आहे.

तपासादरम्यान सीपीआय माओवादी, त्यांचे वरिष्ठ सदस्य आणि हिंसाचार करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांचं संबंध असल्याचं समोर आलं आहे. राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी विविध संघटना त्यांचे पदाधिकारी तसंच सर्वोच्च राजकीय पदाधिकाऱ्यांवर हल्ले करुन घातपात करण्याचा कट सीपीआय माओवादीने रचल्याचंही समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान २८ तारखेला नऊ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुंबई, ठाणे, फरिदाबाद, नवी दिल्ली, हैदराबाद आणि रांची या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. यावेळी हार्ड डिस्क, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, मोबाइल, सीम कार्ड तसंच गुन्ह्याशी आऱोपींचा संबंध असल्याचं स्पष्ट दर्शवणारी कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. तपासात आरोपींविरोधात भक्कम पुरावे हाती लागल्यानेच त्यांना अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.