नीरव मोदी ११ हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे सध्या चर्चेत आहे. याचप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नीरव मोदीच्या मालमत्तांवर छापेमारी सुरु केली आहे. ईडीच्या पथकाने ठाण्यातील विवियाना मॉलच्या तळमजल्यावर असलेल्या शॉपर्स स्टॉपमधील गिली शोरुम काऊंटर आणि गिली डायमंड ज्वेलरीवर छापा मारला. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

गुरुवारी रात्री ६ जणांच्या पथकाने विवियाना मॉलच्या शॉपर्स स्टॉप येथील डायमंड विक्री करणाऱ्या गिली शॉपचा स्टॉल आणि त्याचे मोठे शॉप असलेल्या गिली डायमंड शॉपवर छापा मारून ही दोन्ही दुकाने सील केली. या छाप्यात ईडीने किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पंजाब नॅशनल बँकेतील ११,३०० कोटी रुपयांच्या देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी याच्या देशभरातील १७ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापे टाकले आहेत. या कारवाईत मोदीच्या मालकीच्या गितांजली जेम्स या दागिन्यांच्या दुकानांतील ५१०० कोटी रुपयांचे हिरे जडजवाहीर आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोदीच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील ईडीने जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर ईडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून नीरव मोदी, त्याची पत्नी अमी मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.