सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि उद्रेक होईल; माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा इशारा

‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा‘ वेबसंवादमाला

देशात आणि राज्यात सध्या करोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारनं तिसऱ्यांदा लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे अर्थचक्र थांबवण्याबरोबर कोट्यवधी लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. करोनामुळे निर्माण झालेली स्थिती आणि लॉकडाउन यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं. ‘सरकारनं लॉकडाउन न वाढवता वेळीच योग्य निर्णय घ्यायला हवे, नाहीतर लॉकडाउन वाढत गेला तर रस्त्यावर सामान्य माणसाचा उद्रेक होईल,’ असा इशारा शिंदे यांनी दिला.

राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता‘तर्फे ‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा‘ ही मुलाखतींची वेबसंवादमाला आयोजित करण्यात आली आहे. ‘साठीचा गझल‘ या उपक्रमाद्वारे माजी तसेच विद्यमान मुख्यमंत्री राज्याच्या साठ वर्षांतील प्रगती आणि भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मालिकेत माजी मुख्यमंत्री शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर रविवारी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संवाद झाला. यावेळी त्यांनी देश आणि राज्यातील विविध प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरं दिली.

लॉकडाउन आणि करोनासंदर्भातील केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले,”करोनाचं संकट मोठं आहे. ते संवेदनशीलतेनं हाताळायला हवं. सर्वकाही ठप्प झालेलं आहे. आज अनेक उद्योग आणि व्यवसाय बंद झाले आहेत. लॉकडाउन लागू केल्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे. मी उगाच टीका करणार नाही. पण, टाळ्या वाजवून, दिवे लावून यातून सुटका होईल, असं हे संकट नाही. सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यानंतर तो वाढवण्यात आला. आता पुन्हा त्यात वाढ करण्यात आली. पण, लॉकडाउन कुठपर्यंत वाढवायचा याचाही विचार करायला हवा. कारण लॉकडाउन वाढत गेला, तर लोक खाणार काय? प्रश्न गंभीर आहे. यामुळे एक दिवस सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि रोषाचा उद्रेक होईल,” असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ex chief minister of maharashtra sushil kumar shinde talk about situation after lockdown bmh

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या