महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गत पाच वर्षांत आदिवासीबहुल नंदुरबारने लक्षणीय कामगिरी नोंदविली असून आतापर्यंत २९३ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली आहेत. प्रारंभी या मोहिमेत आघाडी घेणाऱ्या या जिल्ह्याचा आलेख पुढील काळात उतरंडीचा राहिल्याचे लक्षात येते. उत्तर महाराष्ट्रात ६० टक्के तंटामुक्त होणारा हा पहिलाच जिल्हा.
गावपातळीवर अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविले जावेत आणि भविष्यात तंटे निर्माण होणार नाहीत, या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणून शांततापूर्ण रचनात्मक समाजाची जडणघडण व्हावी, या भूमिकेतून राज्य शासनाने राबविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे यंदा सहावे वर्ष सुरू आहे. या मोहिमेत कामगिरीचा आढावा घेतल्यास सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी बजावल्याचे दिसते. परंतु, त्यात सातत्य राखण्यात हा जिल्हा अपयशी ठरला. मोहिमेच्या पहिल्या वर्षी म्हणजे २००७-०८ मध्ये नंदुरबारमधील थोडी थोडकी नव्हे तर, १७४ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली होती. २००८-०९ मध्ये जिल्ह्याची कामगिरी बरीच घसरली. तेव्हा केवळ ५६ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली होती. त्यापुढील तिसऱ्या वर्षांत म्हणजे २००९-१० मध्ये नंदुरबारमधील ३१ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली. त्यावेळी एका गावाची प्रथमच शांतता पुरस्कारासाठी निवड झाली. २०१०-११ या चवथ्या वर्षांत २१ गावे तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली. २०११-१२ या पाचव्या वर्षांत नंदुरबारचा आलेख आणखी घसरला. त्यावेळी केवळ ११ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली. पण विशेष पुरस्कार एकाही गावाला मिळाला नाही.
दरम्यान, डाकीण ठरविल्या गेलेल्या महिलांचा प्रश्न पोलीस यंत्रणेने या मोहिमेच्या माध्यमातून हाताळला. नंदुरबारचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी ही अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. सरपंच, गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामसेवक, महिला बचत गट सदस्य अशा विविध घटकांच्या सहकार्याने प्रत्येक गावात डाकीण प्रथा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत सर्व घटकांचा समावेश असल्याने गावकऱ्यांची प्रभावीपणे जनजागृती सुरू झाली. आधीच्या घटनांमध्ये डाकीण ठरविल्या गेलेल्या महिलांचे पुनर्वसन करणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि गावकऱ्यांचे प्रबोधन करणे, या त्रिसूत्रीच्या आधारे प्रभावीपणे काम केले जात आहे. आजवरच्या कामगिरीवर नजर टाकल्यास नंदुरबारमध्ये जिल्ह्यात सहभागी होणाऱ्या ५०१ गावांपैकी २९३ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली असून आता केवळ २०८ गावे तंटामुक्त होणे बाकी असल्याचे गृह विभागाच्या अहवालावरून लक्षात येते.
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2013 रोजी प्रकाशित
उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारची लक्षणीय कामगिरी
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गत पाच वर्षांत आदिवासीबहुल नंदुरबारने लक्षणीय कामगिरी नोंदविली असून आतापर्यंत २९३ गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली आहेत. प्रारंभी या मोहिमेत आघाडी घेणाऱ्या या जिल्ह्याचा आलेख पुढील काळात उतरंडीचा राहिल्याचे लक्षात येते. उत्तर महाराष्ट्रात ६० टक्के तंटामुक्त होणारा हा पहिलाच जिल्हा.

First published on: 18-04-2013 at 04:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excellent work of nandurbar in north maharashtra