|| मोहनीराज लहाडे

माती वाहून जाण्याच्या प्रमाणात १५ टक्के वाढ 

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

नगर :  गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जिल्ह्याच्या विशेषत: दुष्काळी नगर, पाथर्डी, शेवगावमधील काही गावांत ढगफुटी झाली. त्याच वेळी जिल्ह्यातील ९६ पैकी २० मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. ही १९३ गावे दुष्काळी पट्टय़ातील आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्याला असाच अनुभव मिळतो आहे. पाऊस पडण्याचे दिवस साधारण तेवढेच असले तरी कमी कालावधीत जास्त पाऊस होऊ लागला आहे. पावसाच्या थेंबांचे आकारही वाढलेले आहेत. याच्या परिणामातून जमिनीची धूप, माती वाहून जाण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. पर्जन्यगुणांकात किमान २५ टक्के वाढ झाल्याने माती वाहून जाण्याच्या प्रमाणात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालेली आढळते. त्यातूनच जलसंधारणाच्या कामांमध्ये बदल करण्याची आवश्यकता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

आदर्शगाव हिवरेबाजार (ता. नगर) या गावाने संकलित केलेली गेल्या ३० वर्षांतील आकडेवारी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अभ्यासकांनी पद्मश्री पोपटराव पवार व कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या एका गटाने केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली. हिवरेबाजारच्या ग्रामसभेत दरवर्षी वर्षांखेरीला पाण्याचा ताळेबंद मांडला जातो. पाऊस किती पडला, पिण्यासाठी पाणी किती उपलब्ध, पिकासाठी किती पाणी राखीव ठेवायचे, त्यासाठी कोणती पीक पद्धती अवलंबायची याचा आढावा ग्रामसभेत घेतला जातो. गावाने माथा ते पायथा पद्धतीने जलसंवर्धन कामे करत पाणलोट विकसित केले.

हिवरेबाजारमध्ये गेल्या तीस वर्षांत सरासरी ३५० मिमी. पाऊस पडतो. पाऊस पडण्याचे सरासरी १५ ते २० दिवस आहेत. एका दिवसात २.५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास तो पावसाचे दिवस (रेनी डे) ग्राह्य मानला जातो. २०१९ मध्ये २४ दिवसांत ४७० मिमी, २०२० मध्ये २१ दिवसांत ८२९ मिमी, तर सन २०२१ मध्ये १३ दिवसांत २६५ मिमी. पाऊस पडला. कमी कालावधीत जास्त पाऊस होऊ लागल्याने, पावसाची तीव्रता वाढल्याने, थेंबांचे आकार वाढल्याने पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले, मातीचा सर्वात वरचा थर, ज्यामध्ये पिकांसाठी आवश्यक असणारी मूलद्रव्ये असतात, वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

म्हणजे पूर्वी माती वाहून जाण्याचे एका हेक्टरमध्ये एक वर्षांचे प्रमाण १० ते १५ टन होते ते आता प्रति हेक्टर प्रति वर्ष २० ते २५ टनांपर्यंत पोहोचले आहे. यास इतर घटकांप्रमाणे कमी कालावधीत पडणारा जास्त पाऊस व पावसाची वाढलेली तीव्रता हे कारणही प्रमुख आहे. अनेक जुनेजाणते शेतकरीही पावसाचे थेंब अधिक टपोरे झाल्याचे मत व्यक्त करतात. साधारण गेल्या पाच वर्षांत जमिनीची धूप वाढविणारा, माती अधिक वाहणारा पर्जन्यगुणांक वाढल्याचे मत कृषी विद्यापीठातील अभ्यासकांनी व्यक्त केले. विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील मृद व जलसंधारण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सचिन नांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी राहुल शेलार, जान्हवी जोशी, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, निखिल पवार यांनी केलेल्या मूल्यमापन अभ्यासातून हे मत व्यक्त करण्यात आले.

मृद व जलसंवर्धनाची चर खोदाई, समतल चर, कंटूर बंडिंग, ग्रेडेड बंडिंग, समतल शेती आदी उपचार कामे, जमिनींचा प्रकार, मातीचा पोत, स्थानिक चढउतार, पावसाची तीव्रता, पीक पद्धती यावर अवलंबून असली तरी त्यामध्ये कमी कालावधीत पडणाऱ्या जास्त पावसामुळे बदल करण्याची आवश्यकताही या अभ्यासातून पुढे आली आहे.

जागतिक तापमानात झालेल्या बदलामुळे ढगफुटी, अतिवृष्टी, कमी काळात जास्त पाऊस पडणे, थेंबांचा आकार वाढणे असे प्रकार दुष्काळी भागात घडत आहेत. परिणामी वेगाने माती वाहून जात आहे. आगामी काळात माती या घटकाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासणार आहे. पूर्वीचे मृद व जल संवर्धनाची उपचार कामे केली जात, त्यामध्ये बदल घडवावा लागणार आहे. प्रथम वनसंवर्धन, नंतर कुरणविकास, मृदसंवर्धन, अखेर जलसंवर्धन, त्याच्या जोडीने पशुसंवर्धन या पद्धतीने काम करावे लागेल. त्यासाठीच हिवरेबाजार दरवर्षी पाण्याचा ताळेबंद मांडून पीकपद्धती निश्चित करते.  – पोपटराव पवार, सरपंच, हिवरेबाजार

प्रति हेक्टर, प्रतिवर्षी माती वाहून जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतर काही घटकांप्रमाणे कमी कालावधीत जास्त पडणारा पाऊस याचाही हा परिणाम आहे. जागतिक वातावरणात झालेल्या बदलामुळे हे घडत आहे. त्यामुळे भविष्यात पाणलोट क्षेत्राची कामे करताना झालेला बदल व कार्बनस्थिरीकरणाशी उपचार कामे संलग्न ठेवावे लागतील. नावीन्यपूर्ण मृद व जलसंवर्धनाची कामे करावी लागतील. – डॉ. सचिन नांदगुडे,  मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग प्रमुख