रत्नागिरी : रत्नागिरी शहरा जवळच असलेल्या मुकादम हॉस्पिटलच्या नजिक पुन्हा गोवंशाचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. खेडशी गयालवाडी येथे नवजात वासराचे अवशेष मिळल्या नंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरी औद्योगिक वसाहत परिसरात काही महिन्यापुर्वी गोवंश वासराचे मुंडके मिळाल्याने रत्नागिरीतील वातावरण चांगलेच तापले होते.

मात्र त्यानंतर पुन्हा खेडशी गायळवाडी येथील मुकादम हॉस्पिटल जवळच नवजात वासराच्या शीर आणि अर्धवट तुटलेले पुढचे दोन पाय हे अवशेष शनिवारी रात्रीच्या सुमारास दिसून आले. त्यानंतर या ठिकाणी हिंदू संघटनांचे पदाधिकारी, शहरातील नागरीक, गोरक्षक तसेच पोलीस दाखल झाले. यावेळी गोरक्षकांनी घटनास्थळीच या अवशेषांचा पंचनामा केला पाहिजे अशी मागणी केल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलवण्यात आले. त्यानंतर हे अवशेष एका नवजात वासराचे असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी विशाल पटेल यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध तक्रार दिल्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९, ३२५, २३८ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५अ , ५ब आणि ९ यानुसार १९ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून ४४ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असून रत्नागिरीतील नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.