महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १८ जणांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ माजली आहे. विरोधकांनी याप्रकरणी सरकारविरोधात षड्डू ठोकला असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे. याप्रकरणी आता चौकशी समिती नेमली असली तरीही काँग्रेसने याप्रकरणातील सत्य समोर आणण्याकरता चंग बांधल्याचे आज नाना पटोले यांनी जाहीर केले. निर्लज्ज सरकारचा पर्दाफाश करणारच, असा निश्चय त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.
“या कार्यक्रमावर सरकारने १३ कोटी ८० लाख खर्च केले असं जाहीर केलं. सरकारी मंत्री पंचपक्वान खात होते, तर दुसरीकडे जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय नाही. वर छप्पर नाही. अशामध्येच पहिला मृत्यू १२.३० वाजता झाला असल्याची माहिती आमच्या समोर येतेय. पहिला मृत्यू झाल्याचं सरकारला कळल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवला. सांस्कृतिक मंत्र्यांनी २० मिनिटे भाषणही केलं. कार्यक्रमाची वेळ साडेदहाची होती. परंतु, गृहमंत्री अमित शाह साडेअकरा वाजता आले. अमित शाहांमुळे कार्यक्रमाला उशीर झाला. परंतु, आप्पासाहेबांकडून वेळ घेऊन कार्यक्रम नियोजित करण्यात आला असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं”, असं नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
“राज्यातील सरकारच्या चुकीमुळे हे हत्याकांड घडले आहे. त्यांच्या निर्दयी मानसिकतेमुळे घडले आहे हे स्पष्ट झालं आहे. त्या घटनेला लपवण्याकरता आयएएस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशी करायला लावली. जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करण्याचं काम राज्यातील सरकार करत आहे. एवढाच दम असेल तर न्यायाधीशांच्या समितीतून ही चौकशी करावी. जनाची नाही, मनाची असेल तर सरकारने राजीनामा द्यावा”, असं थेट आव्हानही नाना पटोले यांनी आज दिलं.
“घटना झाल्यावर आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर आरोप करायचे. त्यानंतर तातडीने सांस्कृतिक मंत्री विदेशात गेले. याप्रकारचे निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिले. या निर्लज्ज सरकारचा पर्दाफाश करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे”, असं नाना पटोले यांनी आज जाहीर केले.
राज्यपालांना भेटणार
सरकारकडून १८ मृतांची आकडेवारी देण्यात येतेय. पण चेंगराचेंगरीचा अंदाज घेतला तर संख्या मोठी आहे. रुग्णालयात शासनाच्या व्यवस्थेने भरती केले तीच आकडेवारी पुढे आली. अनेकजण जीव वाचवण्याकरता स्वतःहून दुसऱ्या रुग्णालयात गेले आहेत. नेमका आकडा सरकारने जाहीर करावा. पण सरकार निर्लज्ज आहे. सरकारच्या चुकीमुळे झालेली घटना आहे. याप्रकरणी आम्ही विशेष अधिवेशनची मागणी आहे. सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्रक घेऊन आम्ही ३० तारखेनंतर महाराष्ट्राचे राज्यपल यांनाही भेटणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.